पित्यासह वयोवृद्ध आजोबाची नातवाकडून चाकूने भोसकून हत्या
दारु पिऊन मानसिक शोषण केल्याच्या रागातून हत्या केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 सप्टेंबर 2025
मुंबई, – जन्मदात्या पित्यासह वयोवृद्ध आजोबाची त्यांच्याच नातवाने गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उशिरा अंधेरी परिसरात घडली. त्यात वडिल मनोज बाबू भत्रे (57) आणि वयोवृद्ध आजोबा बाबू देव्या भत्रे (79) यांचा समावेश आहे. या हल्ल्यात 54 वर्षांचे काका अनिल बाबू भत्रे हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. वडिलांसह आजोबांची हत्या आणि काकांवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आरोपी चेतन मनोज भत्रे (23) याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते. त्याच्या जबानीनंतर या दुहेरी हत्येचा पर्दाफाश झाला होता. या तिघांकडून दारु पिऊन होणार्या मानसिक शोषणाला कंटाळून त्याने ही हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना मंगळवारी रात्री अकरा वाजता अंधेरीतील एमआयडीसी, संतोषी माता चाळीत घडली. याच चाळीत बाबू हे त्यांचे दोन मुले मनोज आणि अनिल, मनोजचे तीन मुलांसोबत राहत होते. त्यात चेतन याचा समावेश असून तो एका मेडीकल शॉपमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्याची बहिणही एका खाजगी कंपनीत कामाला आहे. बाबू, मनोज आणि अनिल या तिघांना मद्यप्राशन करण्याचे व्यसन होते. अनेकदा मद्यप्राशन करुन ते तिघेही चेतनसह त्याचा भाऊ व बहिणीचा शिवीगाळ करुन मानसिक शोषण करत होते. लहानपणापासून त्यांच्याकडून क्षुल्लक कारणावरुन त्यांचा मानसिक शोषण सुरु होता. त्याला ते तिघेही कंटाळून गेले होते.
दिड वर्षांपूर्वी या तिघांकडून होणार्या मानसिक शोषणाला कंटाळून त्याची आईही घर सोडून निघून गेली होती. त्यानंतर ती परत त्यांच्या घरी आली नाही. मंगळवारी सायंकाळी चेतन हा नेहमीप्रमाणे कामावरुन घरी आला होता. यावेळी त्याला त्याचे आजोबा बाबू, वडिल मनेाज आणि काका अनिल हे तिघेही मद्यप्राशन करत असल्याचे दिसून आले. त्याचा भाऊ गरबा पाहण्यासाठी बाहेर गेला होता तर बहिण कामावर घरी आली नव्हती. घरी येताच या तिघांनी क्षुल्लक कारणावरुन चेतनला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती. त्यातून त्याचा राग अनावर झाला आणि त्याने घरातील चाकूने सर्वप्रथम त्याचे वडिल मनोज आणि नंतर आजोबा बाबू यांची गळ्यावर वार करुन हत्या केली होती. त्यानंतर त्याने त्याचे काका अनिलवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर तो प्रचंड घाबरला आणि घराबाहेर पळून गेला होता.
काही वेळानंतर चेतन हा शांत झाला आणि पोलीस ठाण्यात आला. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याने पोलिसांपुढे आत्मसर्मपण केले होते. या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली हाती. जखमी झालेल्या मनोज आणि बाबू यांना जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. अनिलला गंभीर दुखापत झाल्याने त्याला नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर पोलिसांनी चेतनविरुद्ध दुहेरी हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. याबाबत चेतनच्या भावासह बहिणीची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीनंतर या घटनेमागील कारणावर अधिक प्रकाश पडेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.