दहशतीसह भीती निर्माण करण्यासाठी जादूटोण्याचा प्रयत्नाने खळबळ
वयोवृद्ध महिलेच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 सप्टेंबर 2025
मुंबई, – दहशतीसह भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने एका वयोवृद्धाच्या बंगल्याबाहेर काही अज्ञात व्यक्तीनी जादूटोण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी या वयोवृद्ध महिलेच्या तक्रारीवरुन मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय सहिता, महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंधक अधिनियम व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांनी दुजोरा दिला, मात्र तपास सुरु असल्याने अधिक माहिती देण्यास नकार दिला.
नितू भरतभूषण गुप्ता ही 65 वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार महिला मालाडच्या एस. व्ही रोड, राणी सती नगर, विभूषण व्हिला या बंगल्यात एकांकी जीवन जगत आहे. तिच्याकडे तीन नोकर असून ते दिवसा काम करुन तिथेच राहतात. 23 जुलैला तिच्या बंगल्याजवळ अज्ञात व्यक्तीने दहशतीसह भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने जादूटोणा केल्याचे उघडकीस आले होते. काहीतरी विपरीत घडावे, घाबरुन तक्रारदार वयोवृद्ध महिलेला वश करता यावे, त्यातून काहीतरी फायदा व्हावा यासाठी एका पांढर्या रंगाच्या कपड्यामध्ये नितू गुप्ता यांचे पासपोर्ट फोटो, खापराचे मडके, तीन अगरबत्ती, दोन लिंबू, दोन अंडी, तांदूळ आणि कुंकू ठेवले होते. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नितू गुप्ता व तिच्या तिन्ही नोकरांना धक्काच बसला होता. मात्र त्याकडे तिने दुर्लक्ष केले होते.
या घटनेला काही दिवस उलटत नाहीतर तोवर रविवारी 21 सप्टेंबरला अशाच प्रकारे जादूटोणा झाल्याचे तिच्या लक्षात आले. यावेळेस अज्ञात व्यक्तीने एका सफेद रंगाच्या कपड्यात दोर्याने गुंडालेला नारळ, कट केलेले दोन लिंबू, कुंकू, तांदूळ आदी जादूटोणा साहित्य तिच्या राहत्या बंगल्याजवळील मागील कंपाऊंडमध्ये ठेवले होते. नितू गुप्ता यांना नाहक त्रास देणे, भीती निर्माण करणे यासाठी अज्ञात व्यक्तीकडून अशा प्रकारे जादूटोण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे तिच्या लक्षात आले होते. त्यामुळे तिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती.
तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय सहितासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता ठोंबरे या करीत आहेत. दरम्यान या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांना तपासाचे आदेश देत दोषी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहे. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.