पैशांवरुन झालेल्या मारहाणीत पोलीस हवालदार पतीचा मृत्यू
सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत पत्नीसह मुलाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 सप्टेंबर 2025
मुंबई, – पैशांवरुन सतत भांडण करुन प्रविण शालीग्राम सूर्यवंशी या पोलीस हवालदार पतीला बेदम मारहाण करुन त्यांच्या मृत्यूप्रकरणी पत्नीसह मुलाला वडाळा टी टी पोलिसांनी अटक केली आहे. स्मिता प्रविण सूर्यवंशी आणि प्रतिक प्रविण सूर्यवंशी अशी या दोघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर दोन्ही आरोपींना लोकल कोर्टाने शनिवार 27 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटना घडल्यानंतर साडेचार महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोषी पत्नी आणि मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना 9 मे 2025 रोजी सायन येथील प्रतिक्षानगर, पोलीस अधिकारी वसाहतीतच इमारत क्रमांक ए विंगमध्ये घडली. याच इमारतीच्या तिसर्या मजल्यावरुन फ्लॅट क्रमांक 302 मध्ये प्रविण सूर्यवंशी हे त्यांच्या पत्नी स्मिता आणि मुलगा प्रतिक यांच्यासोबत राहत होते. ते सध्या मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांची नेमणूक शिवाजीनगर पोलीस ठाण्यात होती. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे त्यांच्या पत्नी स्मिता आणि मुलगा प्रतिक यांच्यासोबत पैशांवरुन सतत खटके उडत होते. त्यातून ते दोघेही त्यांचा मानसिक व शारीरिक शोषण करुन त्यांना मारहाण करत होते.
9 मेला त्यांच्यात पैशांवरुन पुन्हा प्रचंड वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात स्मिता आणि प्रतिकने त्यांना जोरात धक्का दिला होता. त्यात खिडकीच्या काचेवर आदळल्याने त्यांच्या गंभीर दुखापत झाली होती. तसेच त्यांच्या उजव्या हाताच्या नसा कापल्या गेल्या होत्या. प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. त्यांना तातडीने औषधोपचाराची गरज होती, मात्र त्यांची पत्नी स्मिता आणि मुलगा प्रतिक यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले नाही. वेळीच औषधोपचार न मिळाल्याने प्रविण सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता.
ही माहिती प्राप्त होताच वडाळा टी टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. प्रविण यांना तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्यांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांनी संशय व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन या संपूर्ण घटनेची चौकशी सुरु केली होती. या चौकशीत प्रविण सूर्यवंशी यांच्या मृत्यूस त्यांची पत्नी आणि मुलगा हेच जबाबदार असल्याचे उघडकीस आले होते.
त्यांच्या मारहाणीत त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना औषधोपचाराची गरज, जास्त रक्तस्त्राव होत असताना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेणे गरजेचे होते. मात्र त्यांनी त्यांच्या उपचाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रविण सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता.
हा प्रकार उघडकीस येताच साडेचार महिन्यानंतर अनुराधा गौतम भोसले यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रविण सूर्यवंशी यांची पत्नी स्मिता आणि मुलगा प्रविण सूर्यवंशी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या मायलेकाला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बुधवारी सकाळी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.