मुख्यमंत्री सहाय्यता निधीसह नोकरीच्या आमिषाने फसवणुक
गुन्हा दाखल होताच इस्टेट एजंट असलेल्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 सप्टेंबर 2025
मुंबई, – मुख्यमंत्री सहायता निधी योजनेतून दहा लाखांचे कर्ज तसेच मुंबई-नागपूर दरम्यान नव्याने सुरु होणार्या वंदे मातरम ट्रेनमध्ये तिकिट तपासणीस म्हणून नोकरीचे आमिष दाखवून एका जोडप्याची फसवणुक झाल्याचा प्रकार मरिनड्राईव्ह परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच इस्टेट एजंट असलेल्या समीर प्रकाश चुंडमुंगे या मुख्य आरोपीस मरिनड्राईव्ह पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या सोमवार 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत असल्याचे तपास अधिकारी जितेंद्र कोळी यांनी सांगितले.
राकेश माणिक शेळके हे काळाचौकी येथील अभ्युदयनगर, गिरीराज सोसायटीमध्ये राहत असून त्यांचा स्वतचा व्यवसाय आहे. एप्रिल 2023 रोजी त्यांच्यासह त्यांची पत्नी शीतल शेळके यांची समीरशी ओळख झाली होती. दक्षिण मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासच्या कॅण्टीनमधील भेटीत समीरने तो चेंबूरच्या गोल्फ क्लब परिसरात राहत असून इस्टेट एजंट म्हणून काम करत असल्याचे सांगितले होते. मंत्रालयासह वरिष्ठ अधिकार्यांशी ओळख असल्याची बतावणी करुन त्याने राकेश शेळके यांना त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री सहायता निधी योजनेतून दहा लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते.
याच दरम्यान त्याने त्यांना त्यांच्या मावशीचा मुलगा सचिन महादेव शेळके याला मुंबई ते नागपूर येथे नव्याने सुरु होणार्या वंदे मातेरम ट्रेनमध्ये टीसी म्हणून नोकरीचे आश्वासन दिले होते. त्यामोबदल्यात त्याने 25 टक्के कमिशन द्यावे लागतील असे सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला कर्जासाठी 50 हजार रुपये तर मावशीच्या मुलाच्या नोकरीसाठी आठ लाख बत्तीस हजार रुपये कमिशन म्हणून दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लाखांचे कर्ज तसेच टीसी म्हणून नोकरी मिळवून दिली नाही. विचारणा केल्यानंतर तो त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. कर्जासह नोकरीच्या आमिषाने त्याने त्यांच्याकडून 15 एप्रिल 2023 ते 30 जून 2024 या कालावधीत 8 लाख 82 हजार रुपये घेतले होते. मात्र त्याने त्याचे आश्वासन पाळले नाही.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच राकेश शेळके यांनी मरिनड्राईव्ह पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर समीर चुंडमुंगे याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्याकडे सोपवून आरोपीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंडे, पोलीस आयुक्त शशिकिरण काशिद, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस उपनिरीक्षक रंगारी व अन्य पोलीस पथकाने समीर चुंडमुंगे याला अटक केली.
चौकशीत त्याने तक्रारदारासह त्यांच्या पत्नी तसेच मावशीच्या मुलाची फसवणुक केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवार 29 सष्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. समीरने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत, याकामी त्याला इतर कोणी मदत केली आहे का, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा तपास सुरु असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सांगितले.