देशी-विदेशी घातक शस्त्रांसह दोन आरोपींना अटक

मालाडसह उत्तरप्रदेशात पोलिसांची धडक कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 सप्टेंबर 2025
मुंबई, – देशी-विदेशी घातक शस्त्रांची खरेदी-विक्रीच्या गुन्ह्यांत दोन आरोपींना मालाड पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. धीरज सुरेंद्र उपाध्याय आणि रविंद्र ऊर्फ राघवेंद्र पांडे अशी या दोघांची नावे आहेत. यातील रविंद्र हा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून त्यानेच धीरजला घातक शस्त्रे विक्रीसाठी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच गावठी कट्टे, एक विदेशी बनावटीचे पिस्तूल, एक मॅगझीन, दोन खाली मॅगझीन, नऊ जिवंत काडतुसे, बारा बोअरचे दहा जिवंत काडतुसे आणि एक मारुती कार जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्याची विक्री करणार्‍या काही टोळ्या सक्रिय असल्याची माहिती मालाड पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यामुळे अशा शस्त्र विक्री करणार्‍या आरोपीविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना मालाड परिसरात काहीजण घातक शस्त्रांसह येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रफिक गवंडी आणि गौस सय्यद यांना मिळाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण, पोलीस निरीक्षक संजय बेडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रफिक गवडी, गौस सय्यद, पोलीस हवालदार सत्यविजय बैसाणे, पोलीस शिपाई महेश डोईफोडे, सचिन गायकवाड, दिवेश मोरे, राजेंद्र पाटील, विलासराव सलगर, राजू कांबळे, आदित्य राणे यांनी मालाडच्या चिंचोली फाटक, यात्री हॉटेलसमोरच साध्या वेशात पाळत ठेवली होती.

16 सप्टेंबरला तिथे आलेल्या धीरज उपाध्यायला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांनी एक गावठी कट्टा, जिवंत काडतुस जप्त केली. चौकशीत त्याने चिंचोली फाटकजवळील रेल्वे ट्रकजवळ आणखीन काही शस्त्रे लपविल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन आणखीन एक गावठी कट्टा जप्त केला. तपासात धीरज हा बोरिवली परिसरात राहत असून रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग, दहिसर, समतानगर, एमएचबी पोलीस ठाण्यात पाचहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. चौकशीत त्याला ते गावठी कट्टे उत्तरप्रदेशात राहणार्‍या रविंद्र पांडे याने दिल्याचे सांगितले. त्यानंतर मालाड पोलिसांची एक टिम उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे गेले होते.

या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने रविंद्र पांडेला ताब्यात घेतले. त्याच्या घरासह मारुती कारची झडती घेतली असता कारमध्ये पोलिसांना तीन गावठी कट्टे, एक विदेशी पिस्तूल, दोन खाली मॅगझीन, एक मॅगझीन, वीस जिवंत काडतुसे सापडली. हा शस्त्रसाठा जप्त करुन त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. या दोघांविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रफिक गवडी, गौस सय्यद हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page