भाड्याने घेतलेल्या कारचा अपहारप्रकरणी आरोपीस अटक

सुरत येथून साडेआठ लाखांची मारुती एर्टिंगा कार हस्तगत

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 सप्टेंबर 2025
मुंबई, – भाड्याने घेतलेल्या कारचा अपहार करुन पळून गेलेल्या एका मुख्य आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. शैलेशकुमार भिकूभाई हिंगू असे या 33 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून अपहार केलेली कार सुरतहून हस्तगत केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हितेश महेंद्र शाह हे विरार येथे राहत असून ते माहीमच्या एका मेडीकल शॉपमध्ये कामाला आहे. त्यांच्याकडे मारुती सुझुकी वॅगान ही कार असून या कारचा ते वैयक्तिक कामासाठी वापर करतात. जानेवारी 2025 रोजी त्यांनी साडेआठ लाखांची मारुती सुझुकी एर्टींगा कार विकत घेतली होती. या दोन्ही कारमध्ये त्यांनी जीपीएस प्रणाली बसविले होते. अनेकदा ते कामावर जाताना नवीन कार घेऊन जात होते. दिवसभर ही कार मेडीकल शॉपसमोर उभी राहत असल्याने त्यांचा भाचा शुभ लालीवाला याने कार भाड्याने देण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरुन कारमधून त्यांना पैसे मिळतील आणि कार एकाच ठिकाणी उभी राहणार नाही. त्याचा सल्ला चांगला वाटल्याने त्यांनी त्यांची नवीन कार भाड्याने देण्याचा निर्णय घेतला होता.

फेब्रुवारी महिन्यांत त्यांनी ती कार शुभच्या कांदिवलीतील राहत्या घरी घरी आणून दिली होती. कार आल्यानंतर शुभने सोशल मिडीयावर कार भाड्याने देण्याबाबत एक जाहिरात दिली होती. या जाहिरातीनंतर त्यांना शैलेशकुमारने संपर्क साधला होता. त्याला सुरतला जायचे होते, त्यासाठी त्याने त्यांच्या नवीन कारची मागणी केली होती. शुभकडे विचारणा केल्यानंतर त्याने शैलेशकुमार हा यापूर्वीही दोन वेळा कार घेऊन गेला होता असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांची कार शैलेशकुमारला दिली होती.

3 जुलैला शैलेशकुमार त्यांची कार घेऊन गेला आणि परत आलाच नाही. त्यामुळे त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्याचा मोबाईल बंद येत होता. शैलेशकुमार हा कार घेऊन पळून गेल्याची खात्री होताच त्यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी कारचा अपहार करुन हितेश शाह यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना शैलेशकुमार हा सुरत येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गिते व अन्य पथकाने सुरत येथून शैलेशकुमार हिंगूला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने कारचा अपहार केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून पोलिसाीं हितेश शाह यांच्या मालकीची कार ताब्यात घेतली होती. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page