शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने गंडा घालणार्या ठगाला अटक
फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 सप्टेंबर 2025
मुंबई, – शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने एका 47 वर्षांच्या रियल इस्टेट एजंटची सुमारे 44 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी सरोश आर मोमीन या ठगाला उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा त्याच्यावर आरोप असून त्याच्याच बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम जमा झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
जयकुमार गुणाशेखर नाडर हे रियल इस्टेट एजंट असून सध्या मालाडच्या मालवणी परिसरात राहतात. 24 एप्रिलला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांनी सीए असलेल्या भाग्यश्री ठक्कर हिच्या शेअरसंदर्भातील एक जाहिरात फॉलो केले होते. त्यानंतर त्यांच्या व्हॉटअपवर एक लिंक पाठविण्यात आली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक द टोरोस क्लब 290 या ग्रुपमध्ये अॅड झाला होता. त्यात अनेक सभासद होते. या ग्रुपमध्ये शेअरसंदर्भातील दैनदिन माहिती दिली जात होती. ग्रुपमधील अनेक सभासद शेअरची माहिती घेत त्यात गुंतवणुक करत होते, या गुंतवणुकीवर त्यांना परवाता मिळत होता. काहींनी त्यांच्या प्रॉफिटचा स्क्रिनशॉट गु्रपवर टाकला होता. त्यामुळे त्यांना त्यांच्यावर विश्वास बसला होता.
याच दरम्यान त्यांना ग्रुप अॅडमिन यशस्वी शर्मा हिचा कॉल आला होता. तिने भाग्यश्री ही त्यांच्या कंपनीची प्रतिनिधी असून त्यांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा होईल असेही तिने त्यांना आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनीही शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. यावेळी तिने त्यांना एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन करुन त्यांनी स्वतचे नाव, मोबाईल क्रमांक, बँक खात्याचा तपशील व इतर माहिती अपलोड केली होती. त्यानंतर त्यांनी टप्याटप्याने विविध शेअरमध्ये 44 लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांनाही चांगला प्रॉफिट झाला होता. त्यामुळे त्यांनी त्यातील काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र यशस्वी शर्माने त्यांच्यावर 11 लाख 30 हजार रुपयांचे लोन असल्याने त्यांना आधी लोनची रक्कम भरावी लागेल. त्यानंतर त्यांना ती रक्कम काढता येईल असे सांगितले. यावेळी त्यांनी त्यांच्या लोनची रक्कम काढून उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा सल्ला दिला, मात्र तिने तसे करता येणार नाही असे सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न सुरु केला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी उत्तर प्राादेशिक सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.
या गुन्ह्यांचा पोलिसांनी तपास सुरु करुन तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या सरोश मोमीन या संशयिताला ताब्यात घेतले होते. तपासात त्याच्याच बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. तो काही सायबर ठगांच्या संपर्कात होता, त्यांच्याच सांगण्यावरुन त्याने बँकेत खाती उघडून त्याचा वापर फसवणुकीसाठी दिला होता. याकामी त्याला या ठगांकडून काही रक्कम कमिशन म्हणून मिळाली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.