मुंब्रा पोलीस ठाण्यातच सहाय्यक फौजदाराला लाचप्रकरणी अटक
गुन्ह्यांत मदत करण्यासाठी 50 हजाराची मागणी केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 सप्टेंबर 2025
ठाणे, – गुन्ह्यांत मदत करण्यासाठी 50 हजाराची लाचेची मागणी करुन 25 हजाराची लाचेची रक्कम घेताना मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लक्ष्मण भालेराव यांना शुक्रवारी ठाणे युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या रायटर कक्षेत ही कारवाई झाल्याने तिथे उपस्थित पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदाराविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्याचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तपास शशिकांत भालेराव यांच्याकडे होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रारदार त्यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी तक्रारदारांना गुन्ह्यांत मदत करण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडे 50 हजाराची लाचेची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला 25 हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने 24 सप्टेंबरला त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात शशिकांत भालेराव यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. दुसर्या दिवशी या तक्रारीची संबंधित अधिकार्यांकडून शहानिशा करण्यात आली होती.
यावेळी शशिकांत भालेराव याने गुन्ह्यांत मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे 50 हजाराची लाचेची मागणी करुन तडजोडीनंतर 25 हजार रुपयांची लाच घेण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी या अधिकार्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराकडून 25 हजाराची लाच घेताना शशिकांत भालेराव याला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या रायटर कक्षेत या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. अटकेनंतर त्याला लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात आणण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध भारतीय भष्ट्राचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यातच शशिकांत भालेरावला अटक झाल्याने तिथे उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.