बांधकाम प्रोजेक्टसाठी कर्जाच्या आमिषाने 1.85 कोटीची फसवणुक

अपहारासह फसवणुकीच्या दोन घटनेत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 सप्टेंबर 2025
मुंबई, – बांधकाम प्रोजेक्टसाठी स्वस्तात कर्ज मिळवून देतो असे सांगून एका वकिलासह बिल्डरची एका टोळीने 1 कोटी 85 लाख रुपयांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वकिलासह बिल्डरच्या तक्रारीवरुन खालिद इरफान खान, निमित्त डिंग्रा आणि गुरुदिपसिंग राजपूत या तिघांविरुद्ध विनोबा भावे नगर पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला आहे. या तिघांविरुद्ध आतापर्यंत दोघांनी तक्रार केली असली तरी त्यांनी अशाच प्रकारे इतर काही बिल्डरसह व्यावसायिकाची फसवणुक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपींची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविणयात येणार आहे.

44 वर्षांचे तक्रारदार प्रसाद गुरुनाथ शेळके हे वकिल असून ते बदलापूर येथे राहतात. त्यांचा साडू हा बिल्डर असून त्याचे काही बांधकाम प्रोजेक्ट सुरु आहे. त्यासाठी त्याला कर्जाची गरज होती. याच दरम्यान त्यांची खालिदशी ओळख झाली होती. त्याने त्यांना त्यांच्या प्रोजेक्टसाठी कमी व्याजदारात कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांची प्रॉपटी सिक्युरिटी डिपॉझिट करण्याची गरज नसल्याचे सांगितले होते. त्यांना केवळ त्यांच्या कंपनीचे काही धनादेश देण्यास सांगितले होते. जून 2023 रोजी त्यांचे साडू त्यांच्या मित्रांसोबत खालिदच्या कार्यालयात गेले होते. यावेळी त्याने त्यांना 50 कोटीचे कर्ज देण्याचे आश्वासन देत त्यांना आधी सव्वाटक्का रक्कम मुद्रांक शुल्क म्हणून भरावी लागेल असे सांगतले. त्यानंतर ते त्यांचे साडू आणि मित्रांनी त्याला 62 लाख 50 हजार रुपये चेक आणि कॅश स्वरुपात दिले होते.

काही दिवसांनी त्याने त्यांच्याकडे विविध कारण सांगून आणखीन पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला पैसे दिले होते. काही दिवसांनी त्याने त्यांच्याकडून पाच कोटीचे दहा धनादेश घेतले होते. ते सर्व धनादेश खालिदच्या कार्यालयात जमा करण्यात आले होते. मात्र जुलै 2024 पर्यंत खालिदने त्यांना 50 कोटीचे कर्ज मिळवून दिले होते. कर्जासाठी त्याने त्यांच्याकडून ऑनलाईन 62 लाख 50 हजार तर कॅश स्वरुपात 75 लाख असे 1 कोटी 37 लाख 50 हजार रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत कर्ज दिले नाही म्हणून त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली होती. यावेळी तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्यांना पैसे परत केले नाही. कर्जाच्या आमिषाने खालिदसह त्याच्या इतर सहकार्‍यांची त्यांची फसवणुक केली होती.

दुसर्‍या गुन्ह्यांतील तक्रारदार अरिमर्दन रामसुमेर सिंह हे बिल्डर असून ते पुण्यातील हवेली, खराडीचे रहिवाशी आहे. त्यांची एका मित्रामार्फत खालिदसह इतर आरोपींशी ओळख झाली होती. यावेळी खालिदने त्यांना त्यांच्या बांधकाम प्रोजेक्टसाठी 50 कोटीचे कर्ज देतो असे सांगितले होते. याच कर्जासाठी त्याने त्यांच्याकडून 76 लाख रुपये घेतले होते, मात्र दिलेल्या मुदतीत त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. वारंवार विचारणा करुनही तो त्यांना टाळत होता. काही दिवसांनी त्याने त्यांना 28 लाख रुपये परत केले होते. मात्र उर्वरित 48 लाखांचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती.

याच दरम्यान त्यांना खालिदसह त्याच्या टोळीने अशाच प्रकारे अनेकांना कर्जाच्या आमिषाने गंडा घातल्याचे समजले होते. हा प्रकार समजताच त्यांनी विनोबा भावे नगर पोलिसांत तक्रार केली होती. या टोळीविरुद्ध अरिमर्दन सिंह आणि प्रसाद शेळके यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. यातील एका गुन्ह्यांत खालिदसह निमित्त डिंग्रा आणि गुरुदिपसिंग राजपूत तर दुसर्‍या गुन्ह्यांत खालिद खान आणि निमित्त डिंग्रा यांचा समावेश आहे. याच गुन्ह्यांत या तिघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page