फ्लॅटसाठी घेतलेल्या ५० लाखांचा अपहार वयोवृद्ध डॉक्टरची फसवणुक

दिड वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीस अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ एप्रिल २०२४
मुंबई, – फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे ५० लाख रुपयांचा अपहार करुन एका वयोवृद्ध डॉक्टरची फसवणुक केल्याप्रकरणी आदिल अहमद अलाना या मुख्य आरोपीस दिड वर्षांनी वांद्रे पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत त्याच्यासोबत झुल्फीकार हैदर सय्यद हा सहआरोपी असून तो दुर्गामाता डेव्हलपर्स कंपनीचा मालक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

६२ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार अजाज मेहमूद छाप्रा हे व्यवसाासाने डॉक्टर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत वांद्रे येथील ३० वा रोड, अँनव्हिला अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची पत्नी आजरा, मुलगा दानिश आणि सून झेबा हेदेखील डॉक्टर असून वैद्यकीय व्यवसायातून मिळणार्‍या उत्पनावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. जुलै २०१८ रोजी आदिल हा त्याचा कॉन्ट्रक्टर मित्र सोहेल सुभेदारसोबत त्यांच्या राहत्या घरी आला होता. यावेळी त्याने झुल्फीकार सय्यद याच्या मालकीची वांद्रे येथील बाजार रोड येथे एक जागा असून तिथे एका इमारतीचे बांधकाम करुन त्याला फ्लॅटची विक्री करायची आहे. त्याच्याकडे इमारतीचे सर्व आवश्यक कागदपत्रांसह मनपाची परवानगी आहे. याच इमारतीमध्ये त्याने त्यांना एक फ्लॅट घेण्याचा सल्ला दिला होता. ५५ लाख रुपयांमध्ये वांद्रे परिसरात फ्लॅट मिळत असल्याने त्यांनी त्यास होकार दिला होता. त्यानंतर त्यांनी झुल्फिकार सय्यदची भेट घेऊन त्यांच्याशी इमारतीविषयी सविस्तर चर्चा केली होती. त्यांचा विश्‍वास बसावा म्हणून झुल्फिकारने त्यांना इमारतीचे बांधकामासह इतर कामाचे जनरल पॉवर ऑफ ऍटनी कागदपत्रे दाखविले होते. तसेच त्यांच्यासोबत जागेची पाहणी केली होती. कागदपत्रांसह जागेची पाहणी केल्यानंतर अजाज छाप्रा यांनी पाच लाख रुपये टोकन अमाऊंट देऊन चौथ्या मजल्यावर एक फ्लॅट बुक केला होता. त्यानंतर त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीचा करार झाला होता. त्यात त्यांना २०१९ साली फ्लॅटचा ताबा आणि कागदपत्रे दिले जातील असे नमूद करण्यात आले होते. काही दिवसांनी झुल्फिकारने इमारतीचे बांधकाम सुरु होते. यावेळी त्याने त्यांच्या उर्वरित पेमेंटची मागणी सुरु केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला टप्याटप्याने ४९ लाख ७५ हजार रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे त्यांनी आदिलला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद येत होता.

चौकशीदरम्यान त्यांना आदिल अलाना याला कुठल्या तरी गुन्ह्यांत अटक झाली असून तो आर्थर रोड कारागृहात असल्याचे समजलेे होते. जानेवारी २०२१ रोजी त्याने आदिलची भेट घेऊन फ्लॅटबाबत विचारणा केली होती. यावेळी त्याने सहा महिन्यांत इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल आणि नंतर त्यांचा फ्लॅटचा ताबा देण्याचे मान्य केले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी त्याला सहा महिने संपर्क साधला नाही. मात्र सहा महिन्यानंतरही तो त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्यांनी दुर्गामाता कंपनीचे मालक झुल्फिकार सय्यद यांची भेट घेतली होती. मात्र त्याने त्यांना फ्लॅटचा ताबा देण्यास नकार देत याबाबत आदिलशी चर्चा करा. त्यानेच त्यांना फ्लॅटचा ताबा देऊ नका असे सांगितले आहे. अशा प्रकारे आदिल आणि झुल्फिकार एकमेकांवर आरोप करुन त्यांना फ्लॅटचा ताबा देत नव्हते किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पैसे परत नव्हते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आदिल अलाना आणि झुल्फिकार सय्यद यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आदिल अलाना अखेर वांद्रे पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page