कौटुंबिक वादातून 56 वर्षांच्या वकिल पत्नीची पतीकडून हत्या
हत्येनंतर पळालेल्या वयोवृद्ध पतीला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 सप्टेंबर 2025
मुंबई, – कौटुंबिक वादातून सावित्रीदेवी राजीव चंद्रभान या 56 वर्षांच्या वकिल पत्नीची तिच्याच पतीने उशीने तोंड दाबून हत्या केल्याची घटना पवई परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या राजीव लाला चंद्रभान या 60 वर्षांच्या आरोपी पतीला पवई पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी दुजोरा दिला आहे.
व्यवसायाने वकिल असलेली सावित्रीदेवी ही महिला पवईतील रेहजा विहार परिसरात राहत होती. राजीव हा तिचा पती असून दोन वर्षांपूर्वी तो एका खाजगी एअरलाईन्स कंपनीतून क्रू मेंबर म्हणून निवृत्त झाला होता. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होता. सतत होणार्या भांडणानंतर त्यांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या एक वर्षांपासून ते दोघेही विभक्त राहत होते. सावित्रीदेवी ही पवईतील फ्लॅटमध्ये तर राजीव हा अंधेरीतील मरोळ परिसरात राहत होता. विभक्त राहत असताना त्याला त्याची चूक समजली होती, त्यामुळे त्याने पुन्हा एकत्र राहण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यासाठी तो सावित्रीदेवीला सांगत होता.
मात्र तिने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला होता. शनिवारी दुपारी तो तिला भेटण्यासाठी पवईतील फ्लॅटमध्ये आला होता. यावेळी त्याने तिला पुन्हा एकत्र राहण्याबाबत विचारणा केली होती, तिने नकार दिल्यानंतर त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. याच वादानंतर त्याने उशीने तोंड दाबून तिची हत्या केली होती. या घटनेनंतर तो प्रचंड घाबरला आणि तेथून पळून गेला होता. दुपारी साडेतीन वाजता मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला सावित्रीदेवी ही तिच्या राहत्या बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली होती.
ही माहिती कंट्रोल रुममधून प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्यसह अन्य पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. तिला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी पळून गेलेल्या राजीव चंद्रभान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सुरुवातीला त्याने त्याचा या हत्येशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले,
मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने त्याच्या पत्नीनी हत्या केल्याचे सांगितले. विभक्त राहिल्यानंतर त्याला त्याची चूक समजली होती, त्यामुळे त्याने सावित्रीदेवीला पुन्हा एकत्र राहण्याचा सल्ला दिला होता, मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती, त्यातून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे त्याने तपासात सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून राजीव चंद्रभान याला अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.