मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 सप्टेंबर 2025
मुंबई, – डोंगरी येथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका आरोपीला डोंगरी पोलिसांनी अटक केली. इम्रान मोहम्मद आयुब अन्सारी असे या 46 वर्षांच्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 333 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्जसहीत तेरा लाखांची होंडा सिटी कार, मोबाईल आणि दिड लाख रुपयांची कॅश असा सुमारे 31 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
डोंगरीतील चिंचबंदर, केशवजी नाईक रोड, एस. टी बिल्डींग, आरे दूध केंद्राजवळ काहीजण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी पावणेपाच वाजता तिथे एका होंडा सिटी कारमधून इम्रान मोहम्मद आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 333 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत साडेसोळा लाख रुपये होती.
या ड्रग्जसहीत होंडा सिटी कार, मोबाईल आणि सुमारे दिड लाखांची कॅश पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीतून त्याच्या इतर काही सहकार्यांची नावे समोर आली आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.