मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 सप्टेंबर 2025
मुंबई, – उत्तराखंड येथून मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेल्या ब्राऊन शुगरसह दोन आरोपींना ओशिवरा पोलिसांनी अटक केली. शादाब अली सत्तार अहमद आणि अबीद बाबू अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे उत्तराखंडचे रहिवाशी आहेत. या कारवाईत पोलिसांनी 66.48 ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे ब्राऊन शुगर जप्त केले असून त्याची किंमत 16 लाख 62 हजार रुपये इतकी आहे. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
रविवारी सायंकाळी ओशिवरा पोलिसांचे पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी जोगेश्वरीतील न्यू लिंक रोड, मेगा मॉलजवळ काहीजण ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रभात मानकर, मनोज गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस अंमलदार आनंद पवार, सिद्धार्थ भंडारे, धनंजय जगदाळे, पोलीस शिपाई विनोद राठोड, सोनूसिंह पाटील, अजीत भंगड यांनी परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.
तिथे गस्त घालताना सायंकाळी साडेसात वाजता दोन तरुण संशयास्पद फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना 66.48 ग्रॅम वजनाचे ब्राऊन शुगरचा साठा सापडला. त्याची किंमत 16 लाख 62 लाख रुपये आहे. तपासात या दोघांनी ते ब्राऊन शुगर उत्तराखंड येथून मुंबई शहरात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांना पोलिसांनी अटक केली.
ते दोघेही उत्तराखंडच भगवापूर आणि हरिद्वारचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर त्यांना सोमवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्यांना ते ब्राऊन शुगर कोणी दिले, मुंबईत ते दोघेही ब्राऊन शुगर कोणाला देण्यासाठी आले होते. त्यांनी यापूर्वीही ड्रग्जची विक्री केली आहे का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.