मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 सप्टेंबर 2025
मुंबई, – पोलीस गस्तदरम्यान ड्रग्ज कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर पाचजणांच्या एका टोळीने अचानक हल्ला केल्याने कुर्ला परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी बळाचा वापर करुन पाचही आरोपींना शिताफीने अटक केली. जहॉगीर आलम शहा मोहम्मद मियाँ, मुमताज आलम बकरीदी शेख, रामलालकुमार विश्वनाथ पंडित, अब्दुल वाहिल भोला शेख आणि मेहताब आलम दुखी शेख अशी या पाचजणांची नावे आहेत. या सर्वांविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत आहेत.
ही घटना शनिवारी रात्री सव्वाआठ वाजता कुर्ला येथील कुरेशीनगर, बर्मासेल रेल्वे पटरी ट्रक, शिवशक्तीनगर झोपडपट्टीसमोरील नाल्याजवळ घडली. अमोल सदाशिव सरडे हे पोलीस शिपाई असून ते नवी मुंबईतील कौपरखैरणे, शिभम सोसायटीमध्ये राहतात. सध्या त्यांची नेमणूक नेहरुनगर विभागात आहे. शनिवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक ढोबळे, पोलीस शिपाई कांबळे, सरडे आदी पथक परिसरात ड्रग्ज कारवाई करत होते. पोलीस गस्त सुरु असताना शिवशक्तीनगर झोपडपट्टीजवळील नाल्याजवळ काहीजण ड्रग्जचे सेवन करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे तिथे ड्रग्ज सेवन करणार्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली होती,
मात्र पोलिसांना पाहताच काहीजण पळून गेले तर पळून जाणार्या पाचजणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी पाचही आरोपींनी गैरकायदेशीर मंडळी जमवून पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्यास सुरु केले. त्यांना धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला होता. त्यामुळे अब्दुल आणि मेहताब यांनी पोलीस शिपाई अमोल सरडे यांचा गणवेश फाडला, त्यांना जोरात धक्का मारुन रेल्वे ट्रकवर पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती मिळताच चुन्नाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करुन एका महिलेसह पाचजणांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. याप्रकरणी अमोल सरडे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पाचही आरोपीविरुद्ध कर्तव्य बजाविणार्या पोलिसांशी हुज्जत घालणे, शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच जहॉगीर मियाँ, मुमताज शेख, रामलालकुमार पंडित, अब्दुल शेख आणि मेहताब शेख या पाचजणांना पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर या सर्वांना कुर्ला येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.