आर्थिक वादातून व्यावसायिकाचे चारजणांच्या टोळीकडून अपहरण
गोरेगाव येथील घटना; गुन्हा दाखल होताच चारही आरोपींना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ एप्रिल २०२४
मुंबई, – आर्थिक वादातून एका ३७ वर्षांच्या व्यावसायिकाचे चारजणांच्या टोळीने अपहरण केल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अपहरणासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या चारही आरोपींना गोरेगाव पोलिसांनी अटक केली. राज मोहम्मद हुसमत अली, ताज मोहम्मद हुसमत अली, राजाबाबू गंगाधर पांडे आणि गोकुळ रामसागर मिश्रा अशी या चौघांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत ते चौघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इरफान शफीउल्ला मणियार हा कांदिवलीतील चारकोप, प्रभात चाळीत राहत असून त्याचा बिल्डींग डेमोलेशनचा व्यवसाय आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो विविध बिल्डरकडून जुन्या इमारतीच्या डेमोलेशनचे कॉन्ट्रक्ट घेतो. या व्यवसायासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने त्याचा मालवणीतील मित्र अक्रम खान याच्याकडे विचारणा केली होती. त्याने त्याची राज मोहम्मदशी ओळख करुन दिली होती. त्याच्याशी व्यवसायसंदर्भात सविस्तर चर्चा केल्याने त्याने त्याला सात लाख दहा हजार रुपये दिले होते. व्यवसायातील मिळणार्या नफ्यातून त्याने परत करण्याचे आश्वासन दिले होते. ही रक्कम घेतल्यानंतर त्याने त्याला पाच लाख रुपये परत केले होते. तरीही राज मोहम्मद उर्वरित रक्कमेसाठी त्याच्याकडे सतत तगादा लावत होता. याच कारणावरुन त्यांच्यात वाद सुरु झाला होता. यावेळी राज मोहम्मदने त्याला फोनवरुन धमकी दिली होती. १ एप्रिलला दुपारी साडेतीन वाजता तो गोरेगाव येथील सिद्धार्थनगर, सौजन्य इमारतीच्या डेमोलेशनचे काम करत होता. यावेळी त्याला राजचा फोन आला आणि त्याने त्याच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केली होती. त्याने त्याला दोन ते तीन दिवसांत पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी त्याने तो सिद्धार्थनगर येथे कामात असल्याचे सांगितले होते. काही वेळानंतर तिथे राज एका कारमधून आला होता. या कारमध्ये त्याचे इतर तीन सहकारी होते.
काही कळण्यापूर्वीच या चौघांनी इरफानला कारमध्ये बसवून नेले. कारमध्येच त्याने बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. कमरेच्या बेल्टने केलेल्या मारहाणीत इरफानच्या हातावर, मानेवर, पोटाला आणि पोटात गंभीर दुखापत झाली होती. काही वेळानंतर ते त्याला घेऊन नवी मुंबईतील ऐरोली परिसरात आले. एका पावडर कोटींगच्या कंपनीत आणल्यानंतर त्यांनी त्याचे हातपाय बांधून पुन्हा हाताने आणि बेल्टने मारहाण करण्यास सुुवात केली. व्यवहारातील आठ लाख रुपये दिले नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीच या चौघांनी दिली होती. याच दरम्यान त्यांनी त्याला त्याच्या वडिलांनी फोन करुन पैशांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर त्यांचा मुलगा घरी येणार नाही ते सांगत होते. त्यामुळे त्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगितले. रात्री साडेनऊ वाजता त्यांनी इरफानची सुटका करुन पलायन केले होते.
घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी त्याला गोरेगाव पोलीस ठाण्यात आणले. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याने चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर राजमोहम्मद, ताजमोहम्मद, राजाबाबू पांडे आणि गोकुळ मिश्रा या चौघांविरुद्ध पोलिसांनी अपहरणासह मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या चारही आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.