प्रॉपटी डिलरवर फायरिंग करणारा शूटर गजाआड

अटकेच्या भीतीने फायरिंगनंतर दिल्लीला पळाला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 सप्टेंबर 2025
मुंबई, – दोन दिवसांपूर्वी प्रॉपटी डिलर अबू तल्हा अव्वल बेग (58) याच्यावर फायरिंग करुन पळून गेलेल्या मुख्य शूटरला गजाआड करण्यात अखेर गुन्हे शाखेला यश आले आहे. निहाज शेख ऊर्फ गुड्डू असे या आरोपी शूटरचे नाव असून फायरिंगनंतर कुर्ला येथून दिल्लीला पळून गेला होता. मात्र दिल्लीला येताच त्याला गुन्हे शाखेच्या युनिट बाराच्या अधिकार्‍यांनी अटक केली. नकोसे कृत्य करुन निहाजची बदनामी करणार्‍या अबूला धडा शिकवण्यासाठी तसेच त्याला कायमचे संपविण्यासाठी त्याने त्याच्यावर फायरिंग केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी कुरार पोलिसांकडे सोपविण्यात आले असून याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अबू बेग हा प्रॉपटी डिलर म्हणून काम करत असून सध्या मालाडच्या संजयनगर, मानव सेवा सहकारी सोसायटीमध्ये राहतो. निहाज हा त्याच्या परिचित आहे. 27 सप्टेंबरला ते दोघेही मालाड येथे भेटले होते. यावेळी या दोघांनी मद्यप्राशन केले होते. दारु पिऊन ते दोघेही अबूच्या घराच्या दिशेने जात होते. पहाटे चार वाजता संजयनगर, रामजी कंपाऊंड तबेलाजवळ येताच निहाज शेखने त्याच्याकडील गावठी कट्ट्याने अबूच्या दिशेने एक गोळी झाडली होती. ती गोळी त्याच्या डोक्याच्या बाजूला लागली होती. मानेतून आणि डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने अबू हा जागीच कोसळला होता. गोळीबारानंतर निहाज हा तेथून पळून गेला होता.

स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी जखमी झालेल्या अबूला तातडीने जवळच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर अबूला पुढील उपचारासाठी जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गोळीबाराची माहिती मिळताच कुरार पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अबूच्या जबानीनंतर पोलिसांनी त्याचा परिचित निहाल शेख याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला होता. नवरात्रोत्सावात झालेल्या या गोळीबाराची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशांनतर गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी संमातर तपास सुरु करुन आरोपीचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन गोळीबारानंतर निहाल हा दिल्लीला पळून गेल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवळ, पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रासकर, युवराज चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अजय सावंत, सहाय्यक फौजदार अल्ताफ खान, कैलास सावंत, सुनिल चव्हाण, बाळकृष्ण लिम्हण, कल्पेश सावंत, संतोष राणे, विनोद अहिरे, संतोष बने, समृद्धी गोसावी, अनिल जाधव, अनंत मोरे, शैलेश बिचकर, नितीन पवार, विशाल ुगाीेमे, प्रसाद गोरुले, हरिश्चंद्र भोसले, शैलेश सोनावणे, गणेश शिंदे, अर्पिता पडवळ, पोलीस शिपाई चंद्रकांत शिरसाठ, अरुण धोत्रे, विपुल ढाके आदींचे एक पथक दिल्लीला पाठविण्यात आले होते.

या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दिल्लीतून निहाज शेख याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच अबूवर गोळीबार केल्याची कबुली दिली होती. त्यांनतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. तपासात अबू आणि निहाज एकमेकांना परिचित असून लहानपणापासून ओळखतात. अबूनेच निहालचे लहानपणी पालनपोषण केले होते. त्याच्यासोबत राहत असताना तो त्याच्याशी नकोसे कृत्य करत होता. त्याला कंटाळून निहाज हा वसई येथे राहण्यासाठी गेला होता. तिथेच तो पेंटरसह जरीकाम करत होता. अनेकदा तो त्याच्याशी नकोसे कृत्य करुन त्याच्याविषयी परिसरात आक्षेपार्ह वक्तव्य करत होता. त्यातून निहाजची प्रचंड बदनामी झाली होती. त्यामुळे त्याला अबूविषयी प्रचंड राग होता. त्यातून त्याने त्याचा गेम करण्याचा निर्णय घेतला होता.

चार महिन्यांपूर्वीच तो बिहारला गेला होता. तेथून त्याने एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे आणली होती. गेल्या चार महिन्यांपासून तो योग्य वेळीची वाट पाहत होता. 27 सप्टेंबरला अबूने त्याला मद्यप्राशनासाठी मालाड येथे बोलाविले होते. त्यामुळे त्याने त्याच दिवशी त्याच्यावर गोळीबार करुन त्याचा गेम खल्लास करण्याची योजना बनविली होती. ठरल्याप्रमाणे तो गावठी कट्टा घेऊन मालाड येथे आला होता. रात्रभर मद्यप्राशन केल्यानंतर ते दोघेही पहाटे चार वाजाता त्याच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्याने गावठी कट्ट्याने त्याच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर तो पळून गेला होता. त्याच्याकडून पोलिसांन गुन्ह्यांतील गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केले आहे.

अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी कुरार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर निहाजला मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page