विनयभंगप्रकरणी आरपीएफच्या दोन पोलिसांवर गुन्हा दाखल
अपंग डब्ब्यातून प्रवास करणार्या महिला पोलिसाला अडविले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 सप्टेंबर 2025
मुंबई, – विनयभंगप्रकरणी रेल्वे पोलीस फोर्सच्या दोन पोलिसांविरुद्ध कुर्ला रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपंग डब्ब्यातून प्रवास करणार्या एका महिला पोलीस शिपायाला उतरण्यास मज्जाव करुन तिच्याशी हुज्जत घातल्याचा या दोघांवर आरोप आहे. विशेष म्हणजे तक्रारदार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल असून तिच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपपत्रानंतर पाच महिन्यानंतर तिने या दोघांविरुद्ध विनयभंग केल्याची तक्रार केल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने बोलताना सांगितले.
तक्रारदार महिला ही बदलापूर येथे राहत असून मुंबई पोलीस दलात ल विभागात कार्यरत आहेत. एप्रिल महिन्यांत ती बदलापूर येथून कामावर जात होती. कल्याण रेल्वे स्थानकात आल्यानंतर ती अपंगच्या डब्ब्यातून प्रवास करत होती. यावेळी तिला आरपीएफ पोलिसांनी खाली उतरण्यास सांगितले, मात्र तिने लोकलमधून खाली उतरण्यास नकार दिला होता. ठाणे रेल्वे स्थानकात ही लोकल येताच अन्य एका महिला पोलीस कर्मचारी अपंगाच्या डब्ब्यात चढली. यावेळी आरपीएफ कर्मचार्याने त्यांना खाली उतरण्यास सांगितले, त्यांनी तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई करुन असे सांगितले.
याच दरम्यान या आरपीएफ कर्मचार्याने त्याच्या सहकारी महिला आरपीएफ कर्मचार्याच्या मदतीने तिला ताब्यात घेऊन घाटकोपर रेल्वे पोलीस ठाण्यात आणले होते. तिथेच तक्रारदार महिलेविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तिच्याविरुद्ध एक महिन्यानंतर आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या आरोपपत्राची माहिती मिळताच तिने कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार करणार्या आरपीएफच्या संबंधित पोलीस कर्मचार्यसह महिला शिपायाविरुद्ध विनयभंगाची तक्रार केली होती.
या तक्रारीत तिने त्यांनी तिला लोकलमधून उतरुन दिले नाही. तिच्याशी हुज्जत घालून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीची कुर्ला रेल्वे पोलिसांकडून शहानिशा सुरु होती. तिच्या तक्रारीवरुन कुर्ला रेल्वे पोलिसांकडून काहीच कारवाई होत नसल्याने तिने वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्यानंतर वरिष्ठांनी तिच्या तक्रारीवरुन संबंधित आरपीएफ पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलिसांनी आरपीएफच्या एका महिलेसह दोन्ही पोलीस कर्मचार्याविरुद्ध 74, 115 (2), 3 (5) भारतीय न्याय सहिता कलमांर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओची शहानिशा केल्यांनतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले. गुन्हा दाखल झाल्याने संबंधित दोन पोलिसांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.