लोकलमध्ये स्टंटबाजी करुन महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न
गुन्हा दाखल होताच स्टंटबाजी करणार्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 सप्टेंबर 2025
मुंबई, – लोकलमध्ये स्टंटबाजी करुन महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न उघडकीस आल्यानतर बोरिवली पोलिसांनी गुन्हा नोेंदवून काही तासांत स्टंटबाजी करणार्या 35 वर्षांच्या आरोपीस अटक केली. नथू गोविंद हंसा असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा गुजरातचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हायरल होताच रेल्वे पोलिसांनी आरोपीचा फोटो एफआरएस प्रणालीमध्ये अपलोड करुन त्याचा शोध घेऊन त्याला अटक केल्याचे एका अधिकार्याने सांगितले.
यातील तक्रारदार महिला ही विरार येथे राहते. 11 सप्टेंबरला ती विरार रेल्वे स्थानकात अंधेरीला जाण्यासाठी आली होती. दादर फास्ट लोकलने प्रवास करताना महिलांच्या डब्ब्याच्या मागील लगेज डब्ब्यातून एक आरोपी प्रवास करत होता. चालत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करुन तो महिलांच्या डब्ब्यात डोकावून महिलांना पाहून अश्लील संभाषण करुन छेडछाडीचा प्रयत्न करत होता. या स्टंटबाजीसह महिलांच्या छेडछाडीचा एक व्हिडीओच सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. बोरिवली रेल्वे स्थानक आल्यानंतर तक्रारदार महिलेने बोरिवली रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात प्रवाशाविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रवाशाविरुद्ध स्टंटबाजी करुन महिलांशी अश्लील संभाषण करुन विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
या घटनेची पोलीस आयुक्त राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त सुनिता साळुंखे-ठाकरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा रावखंडे यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता खुपेरकर यांना तपास करुन संबंधित आरोपीविरुद्ध सक्त कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता खुपेरकर, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री मुलगीर, शेख, पोलीस हवालदार शेख, जाधव, पोलीस शिपाई कांबळे, नवले, वाकडे, सालकर, आरपीएफचे रवि कुंतल, हरि यादव यांनी तपास सुरु केला होता.
मिळालेल्या व्हिडीओसह रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांनी नथू हंसा या 35 वर्षांच्या आरोपीस ताब्यात घेतले होते. चौकशीत नथू हा मूळचा गुजरातच्या वलसाड, शिवजी टेकडी, अतुलनगरचा रहिवाशी आहे. त्याने लोकलमध्ये स्टंटबाजी करुन महिलांशी असभ्य वर्तन करुन विनयभंग केल्याची कबुली दिली. त्याने यापूर्वीही लोकलमध्ये स्टंटबाजी केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यांत अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.