विदेशात नोकरीच्या आमिषाने २४ बेरोजगार उमेदवारांची फसवणुक
मालाडच्या आयेशा प्लेसमेंट कंपनीच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ एप्रिल २०२४
मुंबई, – विदेशात विविध पदासाठी नोकरी उपलब्ध असल्याची बतावणी करुन २४ हून अधिक बेरोजगार उमेदवारांची फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. या उमेदवारांकडून विविध कारणासाठी १७ लाख ७५ हजार रुपये घेऊन ही टोळी पळून गेली आहे. याप्रकरणी आयेशा प्लेसमेंट कंपनीच्या चौघांविरुद्ध मालाड पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यात अभिमन्यू सिंह, सतीश पांडेय, अनम अन्सारी व अन्य एका महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत २४ उमेदवारांची १७ लाख ७५ हजाराची फसवणुक झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली असली तरी या टोळीने दिडशेहून अधिक बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या आरोपींच्या अटकेसाठी मालाड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
विरेंद्र रामआशिष सिंह हे मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहे. गेल्या काही वर्षांपासून ते सौदी अरेबिया, आबुधाबी, कुवैत, दोहा या देशामध्ये रिफायनरी प्लँटमध्ये क्रेन ऑपरेटर म्हणून नोकरी करत होते. कोरोनाची साथ सुरु झाली आणि ते नोकरी सोडून उत्तरप्रदेशात निघून आले होते. तेव्हापासून ते त्यांच्या गावी शेती करत होते. जानेवारी २०२४ रोजी त्यांना मालाडच्या आयेशा प्लेसमेंट कंपनीकडून विदेशात नोकरीची ऑफर आली होती. विदेशात विविध पदासाठी भरती सुरु असून इच्छुक असल्यास त्यांना अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी कंपनीने सांगितल्याप्रमाणे त्यांचे वैयक्तिक माहिती, कामाचा अनुभवाचे प्रमाणपत्र, मेडीकलचे कागदपत्रे सादर केले होते. यावेळी त्यांना सर्व्हिस चार्जेससह तिकिटाचे ७५ हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांना ६५ हजार ट्रान्स्फर केले होते. काही दिवसांनी त्यांना मुंबईत बोलाविण्यात आले होते. मुंबईत आल्यानंतर त्यांना विमान तिकिटासह नोकरीचे नियुक्तीपत्र, व्हिसा देण्यात आला होता. त्यानंतर त्यांना २ एप्रिलला पुन्हा कार्यालयात येण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे ते मंगळवारी २ एप्रिलला कार्यालयात आले होते. यावेळी तिथे १०० ते १२५ लोक होते. या सर्वांना विदेशात नोकरीचे आमिष दाखविण्यात आले होते. कार्यालयाचे लोखंडी शटर कुलूप लावून बंद होते. चौकशीत त्यांना तिथे इतर २३ उमेदवार सापडले. त्यांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून सर्व्हिस चार्जेस म्हणून सतरा हजार दहा हजार रुपये घेण्यात आले होते. तसेच त्यांना देण्यात आलेले विमान तिकिट, नोकरीचे नियुक्तीपत्र आणि व्हिसा बोगस असल्याचे उघडकीस आले होते.
अशा प्रकारे तिथे उपस्थित २४ जणांकडून कंपनीने १७ लाख ७५ हजार रुपये घेऊन त्यांची नोकरीच्या आमिषाने फसवणुक केली होती. त्यामुळे या २४ जणांनी मालाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या सर्वांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. या जबानीनंतर त्यात अभिमन्यू सिंह, सतीश पांडेय, अनम अन्सारी व अन्य एका महिलेविरुद्ध ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपी कार्यालय बंद करुन पळून गेले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.