मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 सप्टेंबर 2025
मुंबई, – मुंबईतील विविध परिसरातून चोरी केलेल्या मोबाईलची बांगलादेशात विक्री करणार्या एका टोळीचा चुन्नाभट्टी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. सचिन लक्ष्मण गायकवाड, तौसिफ आयुब सिद्धीकी, अमर गौरीलाल शंकर, निसार आसिफ हुसैन आलम, आदिक अली मैनुद्दीन शेख, मुर्शीद मंसुर सिद्धीकी, प्रदीप विश्वनाथ गुप्ता आणि अझिझुर अनिसुर रहमान अशी या आठजणांची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी चोरीचे 183 मोबाईल जप्त केले असून त्याची किंमत 30 लाख 48 हजार रुपये आहे. याच गुन्ह्यांत सहा आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून या सर्वांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यात काही बांगलादेशी नागरिक समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
30 ऑगस्टला कुर्ला येथील बसस्टॉपवरुन यातील एका तरुणाचा 35 हजाराचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्याने पळवून नेला होता. याप्रकरणी चुन्नाभट्टी पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. मुंबई शहरात गेल्या काही महिन्यांत मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे वरिष्ठांनी अशा मोबाईल चोरांच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त मृत्यूंजय हिरेमठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल डमरे, राजकुमार पोवार, पोलीस हवालदार कोळसे, पोलीस शिपाई शेट्ये, वडते, परिमंडळ सहाच्या विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मैत्रानंद खंदारे, पोलीस उपनिरीक्षक अजय गोल्हर, पोलीस हवालदार दशरथ राणे, पोलीस शिपाई केदार, राऊत, सानप यांनी तपास सुरु केला होता.
या पथकाने सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन मुंबईसह नवी मुंबईतील सचिन गायकवाड, तौसिक सिद्धीकी, उमर शंकर, निसार आलम, सादिकअली शेख, मुर्शींद सिद्धीकी या सहाजणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून ते सर्वजण मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्यांच्या चौकशीतून त्यांच्या इतर काही सहकार्यांची नावे समोर आले होते. त्यानंतर या पथकाने कोलकाता येथून प्रदीप गुप्ता आणि अझिझुर रेहमान या दोघांना अटक केली.
तपासात ही टोळी मुंबईतील चोरीचे मोबाईलची बांगलादेशात स्वस्तात विक्री करत होते. त्यांनी आतापर्यंत अनेक चोरीच्या मोबाईलची विक्री केल्याचे उघडकीस आले. यातील अझिझुर हा काही बांगलादेशी नागरिकांच्या संपर्कात होता. त्यांच्या मदतीने या मोबाईल चोरीची तिथे स्वस्तात विक्री केली जात होती. या गुन्ह्यांत सहा आरोपींची नावे निष्पन्न झाले असून त्यात काही बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी 30 लाख 48 हजार रुपयांचे 183 चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. ते सर्व मोबाईल त्यांनी मुंबईसह उपनगरातून चोरी केल्याची कबुली दिली. अटकेनंतर आठही आरोपींना कुर्ला येथील लोकल कोटर्ज्ञाने पोलीस कोठडीनंतर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.