मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – पवईतील ग्रीन इन हॉटेलमध्ये मंगळवारी पवई पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी पंधरा विदेशी महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून यातील नऊ महिलांचे व्हिसा संपले आहे तर सहा महिलांना सी फॉर्मचे माहिती पोलिसांना सादर केली नसल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ही माहिती स्थानिक पोलिसांपासून लपवून या महिलांना हॉटेलमध्ये रुम भाड्याने दिल्याप्रकरणी हॉटेल मालकासह मॅनेजरविरुद्ध पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनोद इगन बच्छाव आणि महेश दत्ताराम भुजबळराव अशी या दोघांची नावे आहेत. यातील विनोद हा हॉटेलचा मालक तर महेश हा मॅनेजर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व महिलांना त्यांच्या मायदेशात पाठविण्यात येणार आहे.
सुभाष भगतसिंग खंडागळे हे अंधेरीतील मरोळ पोलीस कॅम्प परिसरात राहत असून सध्या पवई पोलीस ठाण्यात एटीसी पथकात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे, पोलीस हवालदार लांडगे, बोरसे, सुभाष खंडागळे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या आदेशावरुन परिसरात गस्त घालत होते. अंधेरीतील मिलिटरी रोड, प्राईम अॅकेडमी शाळेजवळील हॉटेल ग्रीन इनमध्ये पोलिसांनी तपासणी सुरु केली होती. यावेळी तिथे पोलिसांना विविध रुममध्ये पंधराहून अधिक युंगाडा, केनियन आणि व्हिएतनाम देशाच्या महिला भाड्याने राहत असल्याचे दिसून आले.
या महिलांची पोलिसांची चौकशी केली असता त्यातील नऊ महिलांचा व्हिसा संपल्याचे तसेच सहा विदेशी महिलांनी त्यांचे सी फॉर्मची माहिती स्थानिक पोलिसांना कळविणे गरजेचे असताना तशी कुठलीही माहिती पोलिसांना दिली नसल्याचे उघडकीस आले. तपासात विनोद बच्छाव हे हॉटेल ग्रीनचे मालक तर महेश भुजबळराव मॅनेजर म्हणून काम करतात. या विदेशी महिला व्हिसा संपवूनही मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास होते, सहा विदेशी महिलांनी त्यांचे सी फॉर्म पोलीस ठाण्यात सबमिट केले नव्हते ही माहिती असतानाही हॉटेल मालकासह मॅनेजरने ही माहिती पोलिसांना सांगितली नव्हती.
त्यांनी पोलीस आयुक्त अभियान यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लघंन केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे विनोद बच्छाव आणि महेश भुजबळराव यांच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चौकशीकामी या दोघांनाही पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांची पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. या कारवाईत पोलिसांनी सर्व विदेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची जबानी नोंदविण्याचे काम सुरु आहे.
या महिलांची माहिती संबंधित दूतावास कार्यालयातील अधिकार्यांना देण्यात आली आहे. त्यांना लवकरच त्यांच्या देशात पाठविण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी सांगितले. विदेशी महिलांना हॉटेलमध्ये रुम भाड्याने देणे हॉटेल मालकासह मॅनेजरला चांगलेच महागात पडले आहे.