काम देण्याच्या आमिषाने डान्सर तरुणीवर लैगिंक अत्याचार
गुन्हा दाखल होताच आरोपी डान्सर मित्राला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – काम देण्याच्या आमिषाने एका 31 वर्षांच्या डान्सर तरुणीला आरे कॉलनीतील बंगल्यावर आणून तिच्यावर तिच्याच डान्सर मित्राने लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आशुतोष पूर्णचंद्र मोहंती या 29 वर्षांच्या आरोपी डान्सर मित्राला आरे पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
31 वर्षांची तक्रारदार तरुणी ही डान्सर असून ती तिच्या कुटुंबियांसोबत वर्सोवा परिसरात राहते. आशुतोष हा त्याचा मित्र असून तोदेखील डान्सर असल्याने त्यांच्यात चांगले संबंध होते. त्याने तिला डान्सरचे काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते, त्याच्यावर विश्वास असल्याने तिनेही त्याला कामासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती.
17 मार्च 2025 रोजी तो तिला काम देण्याचे आश्वासन देऊन गोरेगाव येथील आरे कॉलनी, रॉयल पाल्म परिसरातील व्हिलामध्ये घेऊन आला होता. तिथेच त्याने तिच्याशी जवळीक साधून शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. तिने विरोध करुनही त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग आणि नंतर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता.
बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. गेल्या आठवड्यात तिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगून तिचा मित्र आशुतोष मोहंती याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पिडीत तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आशुतोष मोहंतीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत तरुणीसह आरोपीची पोलिसांकडून मेडीकल करण्यात आली आहे.