शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या गंडा घालणार्‍या आरोपीस अटक

बँक खात्यात फसवणुकीचे एक कोटी रुपये जमा झाल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ एप्रिल २०२४
मुंबई, – शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परवाता मिळेल असे आमिष दाखवून एका ३७ वर्षांच्या बँक अधिकार्‍याची सुमारे साडेसात लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी देवकुमार राजकुमार क्षेत्री या आरोपीस झारखंड येथून बीकेसी पोलिसांनी अटक केली. देवकुमार हा ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सायबर ठगांचा सहकारी असून त्याने त्यांच्यासाठी बँकेत एक खाते उघडून दिले होते. या खात्यात गेल्या काही महिन्यांत सुमारे एक कोटी रुपये जमा झाले होते. या पैशांतून त्याला काही रक्कमेचे कमिशन मिळाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

३७ वर्षांचे तक्रारार मिरारोड येथे राहत असून एका खाजगी बँकेत कामाला आहेत. सध्या त्यांची नेमणूक वांद्रे येथील बीकेसी कार्यालयात आहे. ४ जानेवारीला त्यांना सोशल मिडीयावर शेअर-स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करुन जास्तीत जास्त नफा कमाविण्याची एक जाहिरात दिसली होती. त्यामुळे त्यांनी ती लिंक ओपन केली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले होते. ग्रुपमध्ये बहुतांश सभासद स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुक करत होते, त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला नफा मिळत होता. याच दरम्यान ग्रुपच्या ऍडमिनने त्यांना अशाच एका अन्य ग्रुपमध्ये सामिल केले होते. तिथेही त्यांना काहीजण शेअरमघ्ये गुंतवणुक करत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी ऍडमिनच्या सांगण्यावरुन शेअरमध्ये गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीनंतर त्यांना एका कंपनीचे बोगस शिक्के असलेले रिसीट पाठविण्यात आले होते. गुंतवणुकीवर ठराविक दिवसांनंतर त्यांना परवाता मिळणार होता, मात्र हा परतावा न मिळाल्याने त्यांनी ऍडमिनला संपर्क साधण्याचा प्रयतन केला. यावेळी तयाला टॅक्स म्हणून ६५ हजार ९७२ रुपये जमा करण्यास सांगण्यात आले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी ती रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फर केली होती. मात्र ही रक्कम ट्रान्स्फर करुनही त्यांना गुंतवणुकीसह परवाता रक्कम मिळाली नाही. शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने अज्ञात सायबर ठगांनी त्यांची सुमारे साडेसात लाखांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी बीकेसी पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन बीकेसी पोलिसांचे एक विशेष पथक झारखंड येथे गेले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने देवकुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले होते. त्याच्या चौकशीत तो ऑनलाईन फसवणुक करणार्‍या सायबर टोळ्यांसाठी काम करत असल्याचे उघडकीस आले. फसवणुकीसाठी सायबर ठगांना काही बँक खात्याची गरज लागत असल्याने त्याने त्यांच्यासाठी काही बँकेत खाते उघडले होते. त्यापैकी एका बँक खात्यात गेल्या काही दिवसांत फसवणुकीचे सुमारे एक कोटी रुपये जमा झाले होते. रक्कम सायबर ठगांना दिल्यानंतर त्याला काही रक्कमेचे कमिशन मिळाले होते. विशेष म्हणजे पोलीस पकडू नये म्हणून देवकुमार त्याच्या घरासह कार्यालयातील पत्ता चुकीचा देत होता. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याल पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेने ऑनलाईन फसवणुकीचे इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहै.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page