मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – चुकून तुमच्या बँक खात्यात तीस हजार रुपये ट्रान्स्फर झाल्याचे सांगून ती रक्कम परत पाठविण्याची विनंती करताना एका सहाय्यक फौजदाराच्या बँक खात्याची माहिती घेऊन, त्यांना बोलण्यात गुंतवून अज्ञात सायबर ठगाने त्यांच्या बँक खात्यातून 94 हजार ऑनलाईन ट्रान्स्फर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हा घडल्यानंतर तक्रारदार सहाय्यक फौजदाराने एक महिन्यानंतर घडलेल्या घटनेची बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध बीकेसी पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
सचिन प्रभाकर चव्हाण हे भांडुप येथे राहत असून मुंबई पोलीस दलात सहाय्यक फौजदार म्हणून काम करतात. सध्या त्यांची नेमणूक बीकेसी पोलीस ठाण्यात असून ते आठ महिन्यांपासून तिथे कार्यरत आहे. 1 सप्टेंबरला सायंकाळी पावणेआठ वाजता ते वांद्रे येथील बीकेसी, एशियन हार्ट बसस्टॉपवर होते. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन त्यांच्या बँक खात्यात चुकून तीस हजार रुपये ट्रान्स्फर झाल्याचे सांगितले. ते पैसे त्याला हॉस्पिटलमध्ये भरायचे आहे, हॉस्पिटलच्या खात्यात पाठविण्याऐवजी ती रक्कम चुकून तुमच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली आहे. त्यामुळे त्यांनी कॉल सुुरुच ठेवून त्यांच्या बँक खात्याची पाहणी केली होती.
यावेळी त्यांच्या खात्यात तीस हजार क्रेडिट झाल्याचे दिसून आले. त्याने त्यांना एक बँक खाते देऊन तिथे पाच हजार रुपये पाठवा, उर्वरित रक्कमेबाबत नंतर सांगतो असे सांगितले. पैसे पाठवत असताना त्याने त्यांना एक मॅसेज पाठवून त्या मॅसेजवर डबल टॅप करा. पाच आकडी पिन क्रमांक टाकल्यानंतर त्याला पैसे परत मिळतील असे सांगितले. त्यामुळे त्यांनी तसेच केले. काही वेळानंतर त्यांच्या बँक खात्यातून दोन ऑनलाईन व्यवहार झाले होते. या व्यवहारातून सचिन चव्हाण यांच्या बँक खात्यातून 94 हजार 103 रुपये ट्रान्स्फर झाले होते.
समोरील व्यक्तीने त्यांन बोलण्यात गुंतवून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन ही ऑनलाईन फसवणुक केली होती. हा प्रकार नंतर लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईनसह बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.