सायबर गुलामगिरीसाठी बेरोजगार तरुणांच्या तस्करीचा पर्दाफाश

नोकरीच्या आमिषाने विदेशात पाठविणार्‍या दोन्ही आरोपींना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 ऑक्टोंबर 2025
मिरा-भाईंदर, – नोकरीच्या आमिषाने बेरोजगार तरुणांना थायलंड आणि म्यानमार या देशात पाठवून तिथे त्यांचा सायबर गुलामगिरीसाठी वापर करणार्‍या एका टोळीचा काशिमिरा गुन्हे शाखेच्या एकच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत टोळीच्या दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आसिफ खान ऊर्फ नेपाळी आणि रोहितकुमार मरडाणा अशी या दोघांची नावे असून या दोघांनाही मिरारोड आणि सुरत येथून ताब्यात घेण्यात आले होते. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

सय्यद इरतिझा हुसैन आणि अम्मार लकडावाला हे दोघेही बेरोजगार तरुण मिरारोडचे रहिवाशी आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना विदेशात नोकरीचे आमिष दाखविण्यात आले होते. विविध पदावर नोकरी भरती असल्याचे सांगून त्यांना चांगला वेतन मिळेल असे आश्वासन आसिफ खान याने दिले होते. याकामी त्याला अदनान शेख याने मदत केली होती. आसिफने अदनानच्या मदतीने आतापर्यंत अनेक बेरोजगार तरुणांना थायलंड आणि म्यानमार येथे पाठविले असल्याचे भासविले होते. त्यांच्या या आमिषाला बळी पडून सय्यद हुसैन आणि अम्मार लकडावाला यांनी त्यांच्याकडे नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले होते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन या दोघांनाही थायलंड येथे पाठविण्यात आले होते.

थायलंड येथे गेल्यानंतर त्यांना त्यांच्या इतर सहकार्‍यांनी बेकायदेशीरपणे म्यानमार येथे पाठविले होते. तिथे त्यांचा वापर सायबर गुलामगिरीसाठी केला होता. म्यारमार या देशातील युयू8 या सायबर फ्रॉड करणार्‍या कंपनीमध्ये लिओ या चिनी वंशाच्या आणि स्टिव्ह आण्णा या भारतीय इसमाने या तरुणांना भारतीय मुलींच्या नावाने फेसबुकवर खाते उघडण्यास प्रवृत्त केले होते. या खात्याच्या माध्यमातून त्यांना विदेशातील भारतीय लोकांशी फेंडशीप करुन त्यांचा व्हॉटअप क्रमांक मिळवायचा आणि नंतर त्यांना विश्वासात घेऊन क्रिप्टोकरन्सी आणि बिटकॉईनमध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडायचे. अशा प्रकारे म्यारमरमधून या तरुणांना जबदस्तीने फसवणुकीसाठी प्रवृत्त केले जात होते. त्यासाठी त्यांना काही दिवस प्रशिक्षण दिले जात होते. ज्यांनी फसवणुक करण्याचे काम करण्यास नकार दिल्यास त्यांचा संबंधित आरोपींकडून शारीरिक छळ केला जात होता.

सय्यद आणि अम्मार यांना म्यारमार येथे गेल्यांनतर इतर काही भारतीयासह इतर देशातील तरुण भेटले होते. त्यांच्याकडून त्यांना हा प्रकार समजला होता. भारतीय बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून आधी थायलंड आणि नंतर म्यारमार येथे पाठवून त्यांना सायबर गुलामगिरीचे काम देण्यात येत होते. या त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी त्यांच्याकडून सात हजार अमेरिकन डॉलरची मागणी केली जात होती. अशा प्रकारे त्यांनी पाच उमेदवारांच्या नातेवाईकांकडून 42 हजार अमेरिकन डॉलर घेऊन पाचही तरुणांची सुटका केली होती. याबाबत काही तक्रारी गुन्हे शाखेला मिळाली होती.

या माहितीची पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ, काशिमिरा युनिट एकचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, संजय शिंदे, पुष्पेंद्र थापा, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, सचिन हुले, स्वप्निल मोहिले, प्रशांत विसपुते, पोलीस अंमलदार गौरव बारी, धिरज मेंगाणे यांनी तपास सुरु केला होता.

या पथकाने पिडीत तरुणांशी संपर्क साधल्यानंतर मानवी तस्करीसह सायबर गुलामगिरीचा टोळीचा पर्दाफाश झाला होता. त्यानंतर संबंधित आठ आरोपींविरुद्ध नयानगर पोलीस ठाण्यात विविध भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच या पथकाने आसिफ खान याला मिरारोडच्या नयानगर परिसरातून अटक केली. त्याच्या चौकशीतून रोहितकुमार याचे नाव समोर आले होते. रोहितकुमार हा मूळचा आंधप्रदेशच्या विशाखापट्टणमचा रहिवाशी होता. मात्र अटकेच्या भीतीने तो काही दिवसांपासून सुरत येथे लपला होता, ही माहिती प्राप्त होताच या पथकाने सुरत येथून रोहितकुमारला अटक केली.

तपासात रोहितकुमारने खंडणीची रक्कम स्विकारली असून ती रक्कम त्याने पुढे त्यांच्या सहकार्‍यांना पाठविल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसाकडून चौकशी सुरु असून त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चौकशीतून त्यांच्या इतर सहकार्‍यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page