विविध गुन्ह्यांतील 143.53 कोटीचा ड्रग्जच्या मुद्देमालाची विल्हेवाट
1056 किलो ड्रग्जसहीत 2693 कोडीनयुक्त कफ सिरपचा समावेश
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 ऑक्टोंबर 2025
ठाणे, – ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानंतर ठाणे पोलिसांनी विविध कारवाईत जप्त केलेला 143 कोटी कोटी 53 लाख 81 हजाराच्या ड्रग्जचा नाश केला. त्यात 1056 किलो वजनाचे विविध ड्रग्जसहीत 2693 लिटर कोडीनयुक्त कफ सिरपचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत ठाणे शहरात ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. या ड्रग्ज तस्करीची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाने अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली होती. या मोहीमेनंतर परिमंडळ एक ते पाचच्या अधिकार्यासह अंमली पदार्थ विरोधी पथकाने वेगवेगळ्या 163 धडक कारवाईत काही ड्रग्ज तस्करांना अटक केली होती. या आरोपींकडून पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला होता. त्यात हेरॉईन, चरस, चरस ऑईल, गांजा, हायब्रिड गांजा, कोकेन, एमडी, इफेड्रीन पावडर, ब्राऊनशुगर मेथामेफेटेमाईन, मेथेडॉन, केटामाईन, एएसडी पेपर, मॅथेक्युलिन असा 1056 किलो विविध ड्रग्ज आणि 2693 लिटर कोडीनयुक्त कफ सिरपच्या 26 हजार 935 बॉटल्सचा समावेश होता.
या संपूर्ण ड्रग्जची किंमत 143 कोटी 53 लाख 81 हजार रुपये इतकी होती. हा मुद्देमाल नाश करण्यासाठी ठाण्यातील मुद्देमाल नाश समितीने निश्चित केले होते. 29 सप्टेंबर 2025 रोजी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर समितीने मान्यता दिलेल्या 163 गुन्ह्यांतील मुद्देमाल नष्ट करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करुन शासकीय पंच आणि रासायनिक विश्लेषक यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण मुद्देमाल शासनाने प्राधिकृत केलेलया मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी, तळोजा, एमआयडीसी, नवी मुंबइ्र यांच्यामार्फत नाश करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र दौंडकर, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, पोलीस उपनिरीक्षक दिपक डुम्मलवाड, पोलीस हवालदार हरिश तावडे, हुसैन तडवी, अमोल देसाई, पोलीस नाईक अनुप राक्षे, महिला पोलीस हवालदार शिल्पा कसबे, महिला पोलीस शिपाई कोमल लादे, नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक संजय दवणे, अतुल अडुरकर, लक्ष्मण राठोड, चंद्रहास गोडसे, संदीप धांडे यांनी भाग घेतला होता.