फ्लॅटच्या बहाण्याने महिलेसह दोघांची 51 लाखांची फसवणुक
दोन वेगवेगळ्या फसवणुकीप्रकरणी नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – फ्लॅटच्या बहाण्याने एका महिलेसह दोघांची सुमारे 51 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार विक्रोळी आणि ताडदेव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पार्कसाईट आणि ताडदेव पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवुणकीप्रकरणी नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
51 वर्षांची झकीयाबानू गाझी अब्बास जाफरी ही महिला कुलाबा येथे राहत असून तिचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. तिला फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती, त्यामुळे तिने मुंबईतील विविध साईटला भेट घेऊन फ्लॅटची पाहणी केली होती. याच रम्यान तिची विक्रोळीतील एलबीएस रोडवर असलेल्या रॉकलाईन बिल्डरची माहिती मिळाली होती. त्यामुळे ती फ्लॅटबाबत चौकशीसाठी तिथे गेली होती. तिथेच तिला अरिहंत बिल्डकॉन नावाचे एक कार्यालय दिसले होते. कार्यालयातील एका कर्मचार्याने तिला काही सॅम्पल फ्लॅट दाखविले होते. साईटवरील जवळपास सर्व फ्लॅटचे बांधकाम पूर्ण झाले असून सर्व फ्लॅट बुक असल्याचे सांगितले.
मात्र ए विंगमधील सतराव्या मजल्यावरील दोन फ्लॅट क्रमांक 1702 व 1703 विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. तिने फ्लॅटची पाहणी केल्यानंतर तिला फ्लॅट आवडला होता. या फ्लॅटची किंमत 1 कोटी 70 लाख रुपये होती. चर्चेअंती त्यांच्यात 1 कोटी 66 लाख 33 हजार रुपयांमध्ये फ्लॅट खरेदी-विक्रीचा सौदा झाला होता. त्यामुळे तिने 1702 फ्लॅटसाठी त्यांना 25 लाख रुपये कॅश तर 16 लाख रुपये धनादेशद्वारे असे 41 लाख रुपये देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे तिने सेल्स एक्झिक्यूटिव्ह अफरोज आणि प्रसन्न यांना 41 लाखांचे पेमेंट केले होते. उर्वरित सव्वाकोटी फ्लॅटचा ताबा घेतल्यानंतर देण्याचे ठरले होते. त्यासाठी तिला बँकेतून कर्ज घ्यायचे होते. त्यापूर्वी त्यांनी तिला दिव्यंम मेहता हा फ्लॅटचे रजिस्ट्रेशनचे करुन देईल असे सांगितले.
मात्र वारंवार कॉल करुन त्याने तिचे कॉल घेतले नाही. याच दरम्यान तिला तिने बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर दुसर्या व्यक्तीला विक्री झाल्याचे समजले होते. त्यामुळे तिने या तिन्ही कर्मचार्यासह कंपनीचे संचालक हितेश जैन, राजूल जैन आणि मुकेश भारतीया यांच्याकडे विचारणा केली होती, मात्र त्यांच्याकडून तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. या सहाजणांनी फ्लॅटसाठी 25 लाख कॅश तर सोळा लाख रुपये धनादेशद्वारे घेतले होते, मात्र फ्लॅटची परस्पर दुसर्या व्यक्तीला विक्री करुन तिची फसवणुक केली होती.
दुसर्या गुन्ह्यांत एका महिलेसह तिघांविरुद्ध पोलिसांनी कट रचून अपहारासह फसवणुक केल्याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऋतुजा ऊर्फ सुवर्णा जयेश मोडक, विनित विरेश पवार आणि राजेश रघुना तिवारी अशी या तिघांची नावे आहेत. विठ्ठल मारती शिंदे हे 69 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार विरार येथे राहतात. आठ वर्षांपूर्वी त्यांची आरोपींशी ओळख झाली होती. त्यांनी त्यांना त्यांची म्हाडामध्ये ओळख असून त्यांना म्हाडा स्वस्तात फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. डिसेंबर 2017 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत त्यांनी या तिघांना ताडदेवच्या चिखलवाडीत फ्लॅटसाठी टप्याटप्याने तेरा लाख दहा हजार रुपये दिले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर ते तिघेही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्यांनी त्यांना तीन लाख तीस हजार रुपये परत केले. मात्र उर्वरित नऊ लाख ऐंशी हजार परत केले नाही. या पैशांचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तिन्ही आरोपीविरुद्ध ताडदेव पोलिसांत तक्रार केली होती. या दोन्ही घटनेनंतर झकीयाबानू जाफरी आणि विठ्ठल शिंदे यांनी पार्कसाईट आणि ताडदेव पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अफरोज सिद्धीकी, प्रसन्नजीत, दिव्यम मेहता, हितेश मंगलचंद जैन, राजूल मितेश जैन आणि मुकेश भिमराज भारतीया अशी या सहाजणांविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी तर सुवर्णा मोडक, विनित पवार आणि राजेश तिवारी या तिघांविरुद्ध ताडदेव पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच संबंधित नऊही आरोपींची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.