मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास दिल्यास त्यांच्या पालकांविरुद्ध गुन्हा होणार असल्याबाबत जनजागृती करुनही एका महिलेने तिच्या अल्पवयीन मुलाला मर्सिडिज कार चालविण्यासाठी दिल्याचा प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलाच्या 45 वर्षांच्या आईविरुद्ध मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलाला कार चालविण्यास देणे या महिलेला चांगलेच महागात पडले आहे. दरम्यान गुन्ह्यांतील मर्सिडिज कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
अशोक रामदास शेलार हे ठाणे येथे राहत असून मुलुंड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करतात. 26 सप्टेंबरला रात्री अडीच वाजता ते त्यांचे सहकारी पोलीस हवालदार राजेंद्र चौघुले यांच्यासोबत परिसरात गस्त घालत होते. मुलुंडच्या शिवसेना शाखेसमोरील एम. जी रोडवर गस्त घालताना त्यांना एका मर्सिडीज कार भरवेगात जाताना दिसली. त्यामुळे त्यांनी कारचालकाला हात दाखवून थांबण्याचा इशारा केला, मात्र त्याने कार न थांबविता सुसाट वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.
काही अंतर गेल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी ही कार थांबविली. त्यानंतर पोलीस पथक तिथे गेले होते. यावेळी कारमधये एक तरुण बसला होता. यावेळी कारमधील तरुणाला ताब्यात घेऊन त्याचे नाव, राहण्याचा पत्ता आणि कारचे कागदत्रांची पोलिसांनी चौकशी केली होती. यावेळी या तरुणाने त्याचे नाव सांगून तो अठरा वर्षांचा असल्याचे सांगितले. त्याच्याकडे कार चालविण्याचा परवाना नव्हता. त्यामुळे त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
तपासात या कारमधून फेरफटका मारताना त्याने डंपिंग रोड, पाच रस्ता, एम. जी रोडवर भरवेगात कार चालवून, अनेक वाहनांना कट मारुन पळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ही कार पोलिसांनी ताब्यात घेतली होती. ही माहिती नंतर तिच्या पालकांना देण्यात आली. या माहितीनंतर मुलाची आई पोलीस ठाण्यात हजर झाली होती. मुलाच्या आधारकार्डची पाहणी केली असता त्याचे वय अठरा नसून सोळा वर्ष सात महिने असल्याचे उघडकीस आले.
मुलगा अल्पवयीन असताना त्याच्या आईने त्याला मर्सिडिज कार चालविण्यासाठी दिली होती. त्यामुळे अशोक शेलार यांच्या तक्रारीवरुन मुलाच्या आईविरुद्ध पोलिसांनी 199 अ मोटार वाहन कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत मुलुंडच्या मुलुंड कॉलनीतील एका बंगलोजमध्ये राहते. मुलाचे लाड पुरविताना त्याला महागडी मर्सिडिज कार चालविण्यासाठी या महिलेला आता चांगलेच महागात पडल्याचे बोलले जाते.