मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ एप्रिल २०२४
कोल्हापूर, – टोळीच्या वर्चस्वातून झालेल्या वादातून अजय ऊर्फ रावण दगडू शिंदे या २५ वर्षांच्या तरुणाची प्रतिस्पर्धी टोळीने तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर पळून गेलेल्या आठही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. राज संजय जगताप, आकाश आनंद माळी, रोहित अर्जुन शिंदे, सचिन दिलीप माळी, निलेश उत्तम माळी, गणेश सागर माळी, प्रशांत संभाजी शिंदे आणि निलेश बाबर अशी या आठजणांची नावे असून ते सर्वजण कोल्हापूरच्या डबरी वसाहत, नांदणी नाका, विडशेडचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी सायंकाळी झालेल्या या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अजय शिंदे हा कोल्हापूरच्या यादवनगर, डबरी वसाहतीत राहतो. गुरुवाी सायंकाळी साडेपाच वाजता अजयची त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीने रंकाळा टॉवर, रंकाळा तलावाजवळ तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. या हत्येनंतर सर्व आरोपी पळून गेले होते. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या हत्येची गंभीर दखल घेत पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर आणि राजवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना पळून गेलेल्या राज जगताप, आकश माळी, रोहित शिंदे, सचिन माळी, निलेश माळी, गणेश माळी, प्रशांत शिंदे आणि निलेश बाबर या आठही मारेकर्यांना वेगवेगळ्या परिसरातून काही तासांत पोलिसांनी अटक केली. प्राथमिक तपासात ही हत्या टोळीच्या वर्चस्वातून झाल्याचे उघडकीस आले होते. या टोळीचा अजय शिंदे व त्याच्या सहकार्यांशी वाद होता. हा वाद मिटवायचा आहे असे सांगून त्यांनी अजयला रंकाळा टॉवरजवळ बोलाविले होते. तिथे आल्यानंतर या टोळीने अजयची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती.
गुन्हा दाखल होताच पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी अजीत टिके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे रविंद्र कळमकर, संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, संदीप बाबर, पोलीस अंमलदार अमर आडुळकर, प्रविण यांनी हत्येचा गुन्ह्यांचा पर्दाफाश करुन काही तासांत आठही आरोपींना अटक केली. याच गुन्ह्यांत ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.