भांडणात मध्यस्थी करणार्‍या पोलिसांना धक्काबुक्की करुन मारहाण

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – भांडणात मध्यस्थी करणार्‍या पोलिसांना धक्काबुक्की करुन दोन तरुणांनी मारहाण केल्याची घटना कुर्ला परिसरात घडली. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की करुन मारहाण करणे तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुभम दिलीप भोसले आणि गणेश अशोक कदम अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आले.

ही घटना गुरुवारी 2 सप्टेंबरला रात्री पावणेदोन वाजता कुर्ला येथील मुगल ढाबासमोर घडली होती. रामचंद्र जगन्नाथ उघडे हे पोलीस शिपाई असून सध्या ते कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. गुरुवारी रात्री रामचंद्र उघडे हे नाईट शिफ्टवर हजर झाले होते. बीट मार्शल म्हणून काम करताना ते पोलीस ठाण्यातील बीट क्रमांक चारमधील आस्थापना बंद करत होते. यावेळी रात्री पावणेदोन वाजता मुघल ढाबा या हॉटेलसमोर दोन तरुण एकमेकांना शिवीगाळ करुन मारहाण करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी तिथे धाव घेऊन मारहाण करणार्‍या दोन्ही तरुणांना समजावून बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यांना पिटर मोबाईल एक वाहनामध्ये बसवत असताना शुभम भोसले यांनी त्यांची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ करुन तू कोन आहे रे असे उद्धट संभाषण केले होते. त्यानंतर त्याने पोलीस वाहनामध्ये बसण्यास नकार देत त्यांना जोरात धक्का दिला होता तर गणेश कदमने त्यांना धक्काबुक्की करुन मारहाण केली होती. इतकेच नव्हे तर पोलीस कुर्‍हाडे यांना आईवरुन घाणेरडी शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करुन या दोघांनाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले होते. मात्र पोलीस ठाण्यात आणल्यानंतरही त्यांनी तिथे उपस्थित अधिकारी आणि अंमलदारांना शिवीगाळ करुन पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलीस ठाण्यात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत दोन्ही आरोपीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस शिपाई रामचंद्र उघडे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शुभम भोसले आणि गणेश कदम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना 35 (3) ची नोटीस देऊन सोडून देण्यात आले.

पोलीस हवालदाराला बाईकस्वाराकडून मारहाण
अन्य एका घटनेत कर्तव्य बजाविणार्‍या पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी मोहम्मद अहमद इब्राहिम सिद्धीकी याला डी. बी मार्ग पोलिसांनी अटक केली. सुरेश मांगो महाजन हे कल्याण येथे राहत असून सध्या डी. बी मार्ग पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून काम करतात. शुक्रवारी साडेबारा वाजता ते त्यांच्या सहकार्‍यासोबत ग्रॅटरोड पोलीस चौकीसमोरील अली भाई प्रेमजी रोडवर कर्तव्य बजावत होते. यावेळी बाईकवरुन जाणार्‍या एका तरुणाला त्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केा.

मात्र या तरुणाने निष्काळजीपणाने बाईक चालवून पोलिसांच्या अंगावर बाईक नेण्याचा प्रयत्न केला. त्याचा तोल गेल्यानंतर तो खाली पडला. त्यानंतर त्याने पोलीस हवालदार शिंदे यांना जोरात ठोसा लगावला तर सुरेश महाजन यांना धक्काबुक्की करुन खाली पाडून सरकारी कामात अडथळा आणला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच मारहाण करणार्‍या मोहम्मद अहमद सिद्धीकीला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page