खंडणीसह हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक

गुन्हा दाखल होताच गेल्या दहा महिन्यांपासून फरार होता

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – खंडणीसह हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या इस्माईल इब्राहिम शेख या आरोपीस देवनार पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल होताच इस्माईल हा पळून गेला होता, अखेर दहा महिन्यानंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

जानेवारी महिन्यांत इस्माईल शेख याच्यासह इतर आरोपीविरुद्ध देवनार पोलिसांनी खंडणीसह हत्येचा प्रयत्न तसेच अन्य भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांच्या अटकेनंतर इस्माईल शेख हा पळून गेला होता. गेल्या दहा महिन्यांपासून तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. त्याचा देवनार पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना इस्माईल हा त्याच्या मानखुर्द येथील शिवनेरी रोड, एकतानगर, संत सेवालाल महाराज चाळीतील राहत्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश यादव यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक विजयकुमार अंगरगे, पोलीस उपनिरीक्षक राजू साळुंखे, पोलीस शिपाई अभिजीत करवडे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या इस्माईलला पोलिसांनी शिताफीने अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आल होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

अजामिनपात्र वॉरंटमधील दोन आरोपींना अटक
दुसर्‍या कारवाईत गोवंडी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या गुन्ह्यांत अजामिनपात्र वॉरंटमधील दोन आरोपींना अटक केली. कुणाल पांडुरंग कांबळे आणि विशाल राजू गायकवाड अशी या दोघांची नावे आहेत. चार वर्षापूर्वी गोवंडी पोलिसांनी कुणाल आणि विशाल यांच्याविरुद्ध 307, 504, 506 भारतीय दंड सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र सादर केल्यानंतर या खटल्याची विशेष सेशन कोर्टात नियमित सुनावणी सुरु होती. मात्र ते दोघेही खटल्याच्या सुनावणीला सतत गैरहजर राहत होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट जारी करुन गोवंडी पोलिसांना त्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ सावंत यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार जायभाय, भडवळकर, पोलीस हवालदार बोराटे यांनी ा दोन्ही आरोपींना मिळालेल्या माहितीवरुन गोवंडी परिसरातून अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.

एमडी ड्रग्जसहीत दोन तरुणांना अटक
तिसर्‍या कारवाई एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली. मोहम्मद फैज अली खान आणि जाहिद जहाँगीर अली शेख अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी ऐंशी हजाराचे चाळीस ग्रॅम एमडी जप्त केले आहे. ट्रॉम्बे परिसरात काही तरुण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋता नेमलेकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील लोंढे, पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर, सहाय्यक फौजदार धुमाळ, पोलीस हवालदार आव्हाड, पाटील, पोलीस शिपाई पवार, आटपाडकर यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून मोहम्मद फैज आणि जाहिद शेख या दोघांनाही एमडी ड्रग्जसहीत अटक केली. या आठवड्यातील ट्रॉम्बे पोलिसांची ही सलग दुसरी एमडी ड्रग्ज कारवाई आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page