मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – बारमध्ये काम करणार्या बारगर्लला ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी पाठवून बारमध्ये सुरु असलेल्या एका सेक्स रॅकेटचा आरसीएफ पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी बारच्या दोन मॅनेजरला पोलिसांनी अटक केली असून कारवाईत आठ बारगर्लची सुटका केली आहे. मेडीकलनंतर त्यांना गोवंडीतील देवनार परिसरात असलेल्या नवजीवन महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केलेल्या निशिकांत सदानंद साऊ आणि आताऊ रेहमान अब्दुल खालिद या दोन्ही मॅनेजरला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत बारचा मालक वसंत चंद्रशेखर शेट्टी याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.
चेंबूरच्या आर. सी मार्ग, वाशीनाका परिसरात प्रमिला नावाचे एक बार अॅण्ड रेस्ट्रॉरंट आहे. या बारमध्ये काही तरुणी बारगर्ल म्हणून काम करत असून त्यांच्या मदतीने तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एका बोगस ग्राहकाला बारमध्ये पाठविले होते. बार मॅनेजरशी बारगर्लबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी त्याच्यासोबत काही बारगर्लला शारीरिक संबंधासाठी पाठविण्याची तयारी दर्शविली होती.
बोगस ग्राहकाकडून सिग्नल प्राप्त होताच आरसीएफ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मौसमी पाटील, लोकेश कानसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुतार, पोलीस उपनिरीक्षक अनिल देवरे, टिळकनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मनिषा कुलकर्णी, उपनिरीक्षक आत्माराम राठोड, नेहरुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टिकेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पाटील, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस शिपाई अमोल खटके व अन्य पोलीस पथकाने संयुक्तपणे कारवाई करुन दोन्ही मॅनेजर निशिकांत साऊ आणि आताऊ खालिद या दोघांना ताब्यात घेतले होते.
या कारवाईत पोलिसांनी आठ तरुणींची सुटका केली. त्यांच्या चौकशीतून बारमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले. बारचे मॅनेजर बारमध्ये येणार्या ग्राहकांना शारीरिक संबंधासाठी त्यांच्याकडे पाठवत होते. बारमधील एका रुममध्ये संबंधित बारगर्ल ग्राहकासोबत शारीरिक संबंध ठेवत होते. ग्राहकाकडून मिळालेली अर्धी रक्कम बारच्या गल्ल्यात जमा होत होती तर उर्वरित अर्धी रक्कम संबंधित बारगर्लला दिली जात होती.
तपासात आलेल्या या माहितीनंतर बारचा मालक वसंत शेट्टी, दोन्ही मॅनेजर निशिकांत साऊ आणि आताऊ खालिद यांच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर निशिकांत आणि आताऊ या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत वसंत शेट्टीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.