सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्‍या कंपनीच्या संचालकाला अटक

4.12 कोटीपैकी दिड कोटी खात्यात जमा केल्याचे तपासात उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाती पुरविणार्‍या कोलकात्याच्या एका खाजगी आयटी कंपनीच्या संचालकाला दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. भाविक मोहन पेठाना असे या आरोपी संचालकाचे नाव असून त्याच्या कंपनीच्या बँक खात्यात फसवणुकीची 4 कोटी 12 लाखांपैकी दिड कोटीची रक्कम जमा झाले होते. याच बँक खात्यात देशभरातील 74 हून ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत त्याचा दुसरा सहकारी संचालक प्रणब दे सरकार हा फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. अटकेनंतर भाविकला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

यातील तक्रारदार दक्षिण मुंबईतील रहिवाशी आहेत. ऑगस्ट महिन्यांत त्यांना तनिष्ठा सन्यम आणि अहाना गिल नाव सांगणार्‍या दोन महिलांनी संपर्क साधून त्यांना शेअर गुंतवणुकीबाबत माहिती दिली होती. त्यांचा मोबाईल क्रमांक व्हॉटअप ग्रुपमध्ये समाविष्ठ करुन त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परताव्याचे आमिष दाखविले होते. त्यांच्या या आमिषाला बळी पडून त्यांनी विविध शेअरमध्ये 4 कोटी 12 लाख 36 हजार 106 रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र कुठलाही परतावा तसेच मूळ रक्कम न देता या महिलांनी तक्रारदारांची फसवणुक केली होती.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईनसह दक्षिण प्रादेशिक सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्याची माहिती काढली होती. या माहितीनंतर 16 सप्टेंबरला रेहान नियाज अहमद ठाणगे या 22 वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. तपासात त्याच्याच बँक खात्यात 31 लाख रुपये ट्रान्स्फर झाली होती.

रेहान हा ठाण्यातील शिळफाटा, दोस्ती प्लेनेट नॉर्थ रुबी इमारतीच्या सी विंगमधील रुम क्रमांक 1703 मध्ये राहत होता. त्यानेच सायबर ठगासाठी बँकेत खाती उघडून ते खाते फसवणुकीसाठी दिल्याचे उघडकीस आले होते. 32 लाखांची रक्कम सायबर ठगांना ट्रान्स्फर केल्यानंतर त्याला ठराविक रक्कम कमिशन म्हणून मिळाली होती.

तपासात कोलकाता येथील आश्विनीनगरातील एका आयटी कंपनीच्या बँक खातत 75 लाखांचे दोन ट्रान्झेक्शनद्वारे दिड कोटी जमा झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पोलिसांनी कंपनीच्या बँक खात्याची केवायसी प्राप्त करुन कंपनीचे दोन संचालक भाविक पेठाणा आणि प्रणव दे सरकार यांचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना भाविक पेठाणा याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. भाविक हा गोरेगाव येथील सिद्धार्थनगरचा रहिवाशी आहे. त्यानेच प्रणव सरकारच्या मदतीने कोलकाता येथे बोगस कंपनीच्या बँक खाते उघडून फसवणुकीसाठी या खात्याचा वापर करण्यासाठी सायबर ठगांना दिल्याचे उघडकीस आले.

तो कोलकाता आणि मुंबई असा सतत प्रवास करत होता. अलीकडेच तो मुंबईत आला होता, यावेळी त्याला पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवून गोरेगाव येथून ताब्यात घेतले. आतापर्यंतच्या तपासात भाविक पेठाणा संचालक असलेल्या कंपनीच्या बँक खात्यात देशभरातून 74 फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रक्कम जमा झाल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर 74 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्रातील मुंबईतील पूर्व आणि उत्तर सायबर विभागात प्रत्येक एक आणि दोन असे तीन गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त इरफान शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश भोये, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईशान खरोटे, पोलीस हवालदार वरठे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page