60 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी शिल्पा शेट्टीची चार तास चौकशी
कंपनीशी संबंधित नसल्याच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – व्यवसायात गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका वयोवृद्धाची सुमारे 60 कोटीची फसवणुक केल्याचा आरोप असलेल्या सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची तिच्या राहत्या घरी शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी सुमारे चार तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान तिने पोलिसांना सहकार्य केले, तसेच घोटाळ्यादरम्यान तिचा कंपनीशी काहीही संबंध नव्हता, त्यापूर्वीच तिने कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता याबाबतचे काही कागदपत्रे पोलिसांना सादर केले आहेत. त्यामुळे शिल्पाकडून देण्यात आलेल्या कागदपत्रांची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. यापूर्वी शिल्पाचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा यांची पोलिसांनी चौकशी केली होती. ही चौकशी पाच तास झाली होती.
दिपक रामदास कोठारी हे साठ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार असून ते विलेपार्ले परिसरात राहतात. त्यांची लोटस कॅपिटल फायनान्स सव्हिसेस नावाची एक खाजगी कंपनी असून याच कंपनीत ते संचालक म्हणून काम करत होते. दहा वर्षापूर्वी त्यांची शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याशी ओळख झाली होती. त्यांना त्यांना बेस्ट डिल या गृहखरेदी आणि ऑनलाईन रिटेल प्लॅटफॉर्मचे संचालक असल्याचे सांगून त्यांच्या व्यवसायात गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून दिपक कोठारी यांनी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीसोबत एक करार करुन त्यांच्याकडे 60 कोटीची फसवणुक केली होती.
मात्र कंपनीला प्रचंड नुकसान झाल्याचे सांगून या दोघांनी त्यांना कुठलाही परतावा तसेच गुंतवणुक केलेली साठ कोटी परत न करता फसवणुक केली होती. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केले होते. या नोटीसनंतर राज कुंद्रा याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. मात्र तो चौकशीसाठी हजर राहिला नव्हता. अखेर 15 सप्टेंबरला राज कुंद्रा आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजर झाला होता. यावेळी त्याची पोलिसांनी सुमारे पाच तास चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली आहे. या चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले.
ही चौकशी ताजी असताना शनिवारी 4 ऑक्टोंबरला गुन्हे शाखेचे एक पथक शिल्पा शेट्टीच्या घरी गेले होते. यावेळी तिची चार तास चौकशी करण्यात आली. तिने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. हा घोटाळा झाला तेव्हा ती कंपनीत संचालक म्हणून कार्यरत नसल्याचे काही कागदपत्रे सादर केली होती. तसेच तिच्याकडून कंपनीचे इतर काही कागदपत्रे पोलिसांना देण्यात आली आहे. या सर्व कागदपत्रांची पोलिसांकडून शहानिशा सुरु आहे.