मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका टेम्पोच्या धडकेने 78 वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना सांताक्रुज येथे घडली. काशिनाथ राजाराम भगत असे या वयोवृद्धाचे नाव असून त्यांच्या मृत्यूप्रकरणी चुन्नू साहावन गौरीया या आरोपी टेम्पोचालकाला वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याला नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले. हा अपघात सोमवारी दुपारी साडेबारा वाजता सांताक्रुज येथील नेहरु रोड, वाकोला ब्रिजजवळील पश्चिम वाहिनीवर झाला.
विनया विशाल भगत ही महिला सांताक्रुज येथे राहत असून एका शाळेत कामाला आहे. तिच्या पतीचे निधन झाले असून मयत काशिनाथ हे तिचे सासरे आहेत. अनेकदा ते तिच्या नणंद प्रिया प्रफुल्ल वाणी हिच्या नालासोपारा येथे राहत होते. तिथेच काही दिवस राहत होते. वयोमानामुळे त्यांना जास्त समजत नाही. त्यामुळे ते परिसरात हिंडत राहत होते. सोमवारी दुपारी ते घरातून निघून गेले होते. नेहरु रोड, वाकोला ब्रिजजवळ असताना त्यांना एका भरवेगात जाणार्या टेम्पोने जोरात धडक दिली होती.
या अपघातात काशिनाथ हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नंतर केईएम हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला होता. ही माहिती विनया भगतहिला तिच्या शेजारी राहणार्या सुप्रिया हिने सांगितली होती. त्यामुळे ती व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये गेली होती, तिच्यासह इतर नातेवाईकांनी त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये हनविले होते. तिथे उपचार सुरु असताना तिचे सासरे काशिनाथ यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
अपघाताची माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी विनया भगत हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी टेम्पोचालक चुन्नू गौरीया याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने टेम्पो चालवून तिच्या वयोवृद्ध सासर्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले.