बँकेच्या मॅनेजरला ब्लॅकमेल करुन खंडणी वसुलीचा प्रकार उघड
शारिरीक संबंधाबाबत पत्नीला सांगून बलात्काराची केस करण्याची धमकी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
8 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – एका नामांकित कंपनीच्या बँक मॅनेजरला ब्लॅकमेल करुन पाच लाखांची खंडणी वसुली करुन उर्वरित पंचीस लाखांच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार प्रभादेवी परिसरात उघडकीस आला आहे. या बँक मॅनेजरच्या तक्रारीवरुन ज्योती महेंद्र माली या 26 वर्षांच्या तरुणीविरुद्ध दादर पोलिसांनी खंडणीसह ब्लॅकमेल करुन धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ज्योतीने अशाच प्रकारे एका तरुणाला ब्लॅमेल करुन खंडणीसाठी धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या तरुणानंतर तिने तक्रारदार बँक मॅनेजरला त्यांच्या शारीरिक संबंधाची माहिती त्यांच्या पत्नीला सांगून त्यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करण्याची धमकी दिली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपी ज्योती मालाचा शोध सुरु केला आहे.
यातील तक्रारदार मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी असून सध्या ते प्रभादेवी येथे त्यांच्या पत्नीसह मुलीसोबत राहतात. ग्रँटरोड येथील नामांकित बँकेच्या शाखेत ते मॅनेजर म्हणून काम करतात. तीन वर्षांपूर्वी त्यांची ज्योतीशी ओळख झाली होती. त्यांच्या बँकेच्या शाखेत एक आधारकार्ड सेंटर सुरु करण्यात आले होते. तिथेच ज्योती ही काम करत होती. एकाच ठिकाणी काम करत असल्याने त्यांची चांगली ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर मैत्री आणि नंतर प्रेमात झाले होते. तिने ती तिच्या आई-बहिणीसोबत मिरारोड येथे राहत असल्याचे सांगितले होते. त्यांनी एकमेकांना त्यांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. अनेकदा ते दोघेही कामानंतर भेटत होते. या भेटीत त्यांनी त्यांच्या लग्नासह मुलीविषयी सर्व माहिती सांगितली होती.
तरीही तिने त्यांच्याशी मैत्री ठेवली होती. तिच्या सांगण्यावरुन ते तिला घेऊन मथुरा येथे श्रीकृष्ण मंदिर दर्शनासाठी गेले होते. या मंदिरात तिने पुजार्याने दिलेला हार त्यांच्या गळ्यात घातला होता. त्याचे तिने काही फोटो काढले होते. डिसेंबर 2023 रोजी त्यांची पत्नी तिच्या उत्तरप्रदेशातील गावी गेली होती. यावेळी ते एकटेच होते. हीच संधी साधून ती त्यांच्याकडे तीन दिवसांसाठी आली होती. यावेळी त्यांच्यात संमतीने शारीरीक संबंध आले होते. त्यानंतर वेगवेगळ्या हॉटेलमध्येही त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. यावेळी तिने त्यांच्यातील अनेक आक्षेपार्ह फोटो काढले होते. याच दरम्यान ज्योती ही आधारकार्ड सेंटरमध्ये येणार्या नागरिकांना व्यवस्थित सेवा देत नसल्याने तिला कामावरुन काढून टाकण्यात आले होते. नोकरी गेल्याने ती आर्थिक अडचणीत होती. त्यामुळे त्यांनी तिला साडेतीन लाख रुपये दिले होते.
याच दरम्यान त्यांना ज्योतीचे अनुज नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध तसेच त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध आल्याचे समजले होते. तिच्या मोबाईलमध्ये त्यांना एक करारनामा सापडला होता. त्यात ज्योतीने त्याच्यासोबत प्रेमसंंबंध तसेच शारीरिक सबंध ठेवण्यासाठी एक करार केला होता. त्यामोबदल्यात अनुजला तिला पाच लाख रुपये द्यायचे ठरले होते. या प्रकारामुळे त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी तिच्याशी अंतर ठेवण्यास सुरुवात केली. यावेळी तिने त्यांना ब्लॅकमेल करुन 25 लाखांच्या खंडणीची मागणी सुरु केली. ही रक्कम दिली नाहीतर त्यांच्यातील प्रेमप्रकरण आणि शारीरिक संबंधाची माहिती त्यांच्या पत्नीला देण्याची धमकी दिली होती. इतकेच नव्हे तर त्यांच्याविरुद्ध बलात्काराची केस करण्याचीही ती त्यांना धमकी देऊन त्यांचे आयुष्य बर्बाद करु असे सांगत होती.
या घटनेनंतर तिने एका वकिल महिलामार्फत सेटलमेंट घडविण्यचा प्रयत्न केला. मात्र त्यासाठी तिने त्यांच्याकडे तीस लाखांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी तिला पाच लाख कॅश स्वरुपात दिले. मात्र 25 लाख मिळाल्याशिवाय एमओयूवर स्वाक्षरी करणार नाही असे ती सांगत होती. ज्योतीकडून सतत त्यांना ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी दिली जात होती. त्यामुळे त्यांनी दादर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्याविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ज्योतीविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची दादर पोलिसांनी चौकशी सुरु आहे. ज्योतीलने तक्रारदारासह अनुज व इतर काही तरुणांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करुन त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.