प्रतिबंधित गुटखा विक्रीसह साठवणूकप्रकरणी आठजणांना अटक
1.14 कोटीचा गुटखासह चार वाहने, सहा मोबाईल हस्तगत
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
8 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या गुटखा विक्रीसह साठवणूक केल्याप्रकरणी आठजणांच्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 73 लाख 54 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, चार वाहने आणि सहा मोबाईलसह इतर साहित्य असा 1 कोटी 14 लाख 60 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहिता, अन्न सुरक्षा मानेके अधिनियम कायदा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी आहे. तरीही मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री तसेच गुटख्याची साठवणूक केली जात आहे. अशा आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी अशाच आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही मोहीम सुरु असताना प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सुशांत सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर धुतराज, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संदीप रहाणे, पोलीस हवालदार चव्हाण, तुपे, खेडकर, भालेराव, वानखेडे, बैलकर, शेख, पोलीस शिपाई ससाणे, शिर्के, पोलीस हवालदार चालक कदम, पोलीस शिपाई चालक बागल यांनी 4 ऑक्टोंबर घाटकेापर येथील कामराजनगर, एल अॅण्ड टी टी क्रॉस रोड कंन्स्ट्रक्शनसमोरील ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, दक्षिण वाहिनीवर मोहम्मद फिरोज कमरुजमा शेख याला ताब्यात घेतले होते.
त्याच्याकडून पोलिसांनी महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेला व खाण्यास अपायकारक असलेला पानमसाला, तंबाखू असा 13 लाख 44 हजार 900 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला होता. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी फैजान नसीम अन्सारी आणि नवाज मेहंदी अन्सारी या दोघांना ताब्यात घेतले होते. ते तिघेही गुटखा विक्री आणि साठवून करण्याचे काम आरिफभाईसाठी करत असल्याचे उघडकीस आले. त्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी या पथकाने ठाण्यातील नारपोली पोलीस ठाण्यातील दोन गोदामात छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांनी सुपरवायझर, चालक आणि हमाल अशा पाचजणांना पोलिसांनी अटक केली.
या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी आठ आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून 73 लाख 54 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, चार वाहने आणि सहा मोबाईलसह इतर साहित्य असा 1 कोटी 14 लाख 60 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय सहितासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आठही आरोपींविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.