बिल्डरला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी तिघांना अटक
छोटा राजनचा सहकारी डी. के रावसह इतर दोघांचा समावेश
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – दोन बिल्डरच्या आर्थिक व्यवहारात एका बिल्डरला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. या आरोपींमध्ये छोटा राजनचा अत्यंत विश्वासू आणि जवळचा सहकारी डी. के. राव याच्यासह अनिल सिंग आणि मिमित घुटा यांचा समावेश आहे. या तिघांनाही शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. न्यायालयीन सुनावणीसाठी आलेल्या डी. के रावला विशेष सेशन कोर्ट परिसरातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील तक्रारदार बिल्डर असून त्यांना त्यांच्या प्रोजेक्ट आर्थिक मदत हवी होती. त्यामुळे त्यांना त्यांच्याच परिचित एका बिल्डरने दिड कोटी रुपये दिले होते. मात्र त्यांनी त्यांना दिड कोटी व्याजासहीत परत केले नाही. वारंवार विचारणा करुनही ते त्यांना प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे या बिल्डरने हा प्रकार डी. के रावला सांगून त्याला मदत करण्याची विनंती केली होती. त्यानंतर डी. के रावने तक्रारदार बिल्डरला कॉल करुन त्यांच्या बिल्डर मित्राची रक्कम व्याजासहीत देण्यासाठी तसेच त्याला खंडणीसाठी धमकी दिली होती. ही रक्कम दिली नाहीतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
या धमकीनंतर संबंधित बिल्डर प्रचंड घाबरला आणि त्याने वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची भेट घेतली होती. तिथे घडलेला प्रकार सांगून त्यांनी डी. के रावसह इतराविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डी. के रावसह इतर आरोपीविरुद्ध खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना राव हा विशेष सेशन कोर्टात एका खटल्याच्या सुनावणीसाठी आला होता.
ही माहिती प्राप्त होताच या पथकाने त्याला विशेष सेशन कोर्टाच्या आवारातच चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याचे सहकारी अनिल सिंग आणि मिमित घुटा या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरा या तिघांनाही खंडणीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्यांना शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यांची जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यापूर्वी जानेवारी महिन्यांत पश्चिम उपनगरातील एका हॉटेल व्यावसायिकाला डी. के रावने अडीच कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच रावसह इतर सहाजणांना पोलिसांनी अट ककेली होती. या गुन्ह्यांचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे होता. जानेवारीनंतर रावला आता दुसर्या खंडणीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. त्यामुळे राव अजूनही गुन्हेगारी जगतात सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे.