फसवणुकीच्या गुन्ह्यांत सीआयएसएफच्या बडतर्फ अंमलदाराला अटक
फसवणुकीच्या पैशांचा वापर चैनीसह दोन मराठी चित्रपटासाठी केला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – केंद्रासह राज्यात मोठ्या प्रमाणात विविध पदासाठी सकारी नोकरी उपलब्ध असल्याची बतावणी करुन नोकरीच्या आमिषाने गंडा घालणार्या सीआयएसएफच्या एका बडतर्फ अंमलदाराला दिल्लीतून आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. निलेश काशिराम राठोड असे या अंमलदाराचे नाव असून त्याने आतापर्यंत साठहून अधिक कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईसह नवी मुंबई, अकोला आणि पुण्यात गुन्हे दाखल असून या गुन्ह्यांत त्याला पहिल्यांदाच आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा ताबा लवकरच नवी मुंबई, अकोला आणि पुणे पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे. फसवणुकीची कोट्यवधीची रक्कम त्याने स्वतच्या चैनीसह दोन मराठी चित्रपटासाठी खर्च केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील बेरोजगार तरुणांना केंद्रासह राज्यात विविध पदासाठी नोकरी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांना सरकारी नोकरीचे गाजर दाखवून निलेश राठोड याने अनेकांकडून नोकरीसाठी पैसे घेतले होते. अशाच प्रकारे संतोष गणपतराव खरपुडे यांना सरकारी नोकरीचे आमिष दाखविण्यात आले होते. संतोष हा मूळचा बीडचा रहिवाशी असून सध्या नवी मुंबईत राहतो. तो सध्या एका खाजगी कंपनीत कामाला आहे. सरकारी नोकरी मिळत असल्याने त्याने निलेशला पाच लाख रुपये दिले होते. अशाच प्रकारे निलेशने त्याच्यासह इतर काही बेरोजगार तरुणांकडून नोकरीसाठी प्रत्येकी पाच ते पंधरा लाख रुपये घेतले होते. या सर्वांना बोगस मेडीकल टेस्ट आणि अॅपाईटमेंट लेटर देऊन तो पळून गेला होता. त्याने अनेक बेरोजगार तरुणांकडून 2 कोटी 88 लाख रुपये घेतले होते, मात्र कोणालाही नोकरी दिली नव्हती.
हा प्रकार नंतर संबंधित तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत निलेश राठोडविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी बोगस दस्तावेज देऊन नोकरीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना निलेशची पत्नी दिल्लीत राहत असून तो तिला भेटण्यासाठी दिल्लीत गेला आहे. सध्या तो दिल्लीत वास्व्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पवार, पोलीस हवालदार मंदार राणे, पोलीस शिपाई सचिन निकम यांनी निलेशला दिल्लीतील द्वारका मोड परिसरातून ताब्यात घेतले होते.
या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याच्यावर अटकेची कारवाई करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला मंगळवार 14 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात निलेश हा सीआयएसएफचा बडतर्फ अंमलदार असून तो मूळचा अकोला, बार्शीच्या बोरमलीचा रहिवाशी आहे. 2022 पासून त्याने अनेकांना सरकारी नोकरीचे गाजर दाखविले होते. त्यांच्याकडून नोकरीसाठी पैसे घेतले होते. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा, आझाद मैदान, पुण्यातील डेक्कन, अकोला, नवी मुंबईच्या वाशी पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
या सर्व गुन्ह्यांत तो पाहिजे आरोपी होता. त्याने मुंबईतील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत साठहून अधिक तरुणांची सुमारे दहा कोटीची फसवणुक केली आहे. इतर पोलीस ठाण्यातील आकडा त्यापेक्षा अधिक असल्यासचे बोले जाते. फसवणुकीची रक्कम त्याने चैनीखातर आणि दोन मराठी सिनेमा बनविण्यासाठी खर्च केल्याची कबुली दिली. ज्या तरुणांची निलेशने फसवणुक केली आहे, त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ही कारवाई सहपोलीस आयुक्त निशीत मिश्र, पोलीस उपायुक्त निमित्त गोयल, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश ओझा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पवार, पोलीस हवालदार मंदार राणे, पोलीस शिपाई सचिन निकम यांनी केली.