पिटाच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड असलेल्या महिलेस बारा वर्षांनी अटक
मुंबईतून पळून गेल्यानंतर आंधप्रदेशात वास्तव्यास होती
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – पिटाच्या गुन्ह्यांत गेल्या बारा वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या एका आरोपी महिलेस डी. बी मार्ग पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. चन्नाबेगम शेख ऊर्फ रोजा असे या महिलेचे नाव असून कारवाईनंतर मुंबईतून पळून गेलेली रोजा ही गेल्या काही वर्षांपासून तिच्या आंधप्रदेशातील गावी वास्तव्यास असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर तिला शनिवारी दुपारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.
जानेवारी 2013 रोजी ग्रँटरोड येथील एका कुंटनखान्यात डी. बी मार्ग पोलिसांच्या एका विशेष पथकाने कारवाई केली होती. या कारवाईत काही आरोपींना अटक करुन तरुणींसह महिलांची सुटका केली आहे. या तरुणीसह महिलांना विविध कारण सांगून मुंबईत आणून त्यांना एका फ्लॅटमध्ये कोंडून ठेवण्यात आले होते. त्यांना तिथे जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात होते. याप्रकरणी डी. बी मार्ग पोलिसांनी पिटा कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीविरुद्ध कारवाई केली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर रोजा ही पळून गेली होती. ती कोणाच्या संपर्कात नव्हती. त्यामुळे तिच्या अटकेसाठी पोलिसांनी प्रयत्न करुनही तिला अटक करता आली नव्हती.
याच दरम्यान तिच्याविरुद्ध विशेष सेशन कोर्टाने स्टॅडिंग नॉन बेलेबल वॉरंट जारी करताना तिच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश डी. बी मार्ग पोलिसांना दिले होते. या अदोशानंतर पोलीस उपायुक्त डॉ. मोहितकुमार गर्ग, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन दळवी, पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजीम शेख, राजेश पालांडे, पोलीस हवालदार विनोद म्हात्रे, पोलीस शिपाई सागर दिवटे, राठोड, महिला पोलीस हवालदार गवळी आदी पोलिसांचे एक विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने रोजाची पुन्हा माहिती काढण्यास सुरुवात केली.
ही माहिती काढत असताना रोजा ही आंधप्रदेशातील कडप्पा येथील एका कॉस्मेटीक दुकानात काम करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अजीत शेख यांना प्राप्त झाली होती. त्यानंतर या पथकाने तिचा मोबाईल क्रमांक काढली होती. तिच्या अटकेसाठी संबंधित पोलीस टिम आंधप्रदेशात गेली होती. या पथकाने कॉल रेकॉर्डवरुन रोजा ऊर्फ चन्नाबेगम शेख हिला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत तीच पिटा गुन्ह्यांतील गेल्या बारा वर्षांपासून फरार असलेली आरोपी असल्याचे उघडकीस आले. तिच्यावर अटकेची कारवाई करुन तिला नंतर पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. रोजा ही कडप्पाच्या हबीबुल्लाह स्ट्रिटची रहिवाशी असून मुंबईतून पळून गेल्यानंतर ती काही वर्षांपासून तिच्या गावी वास्तव्यास होती.