मुलीला मारहाण करणार्या व्यक्तीची मारहाण करुन हत्या
हत्येच्या गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – मुलीला मारहाण केली म्हणून हुसैन मोहम्मद उमर शेख या व्यक्तीची दोघांनी बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना वरळी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून वरळी पोलिसांनी पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. योगेश श्रीकांत धिवर ऊर्फ बाला आणि समीर श्रीकांत धिवर अशी या दोघांची नावे असून ते दोघेही वरळीतील रहिवाशी आहे. हत्येच्या याच गुन्ह्यांत या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता वरळीतील जी. एम भोसले मार्ग, बीडीडी चाळ क्रमांक चौदा आणि पंधरामधील एलआयसी कार्यालयाजवळ घडली. याच परिसरात हसन मोहम्मद उमर शेख हे राहत असून हुसैन हा त्यांचा लहान भाऊ आहे. धिवर कुटुंबिय याच परिसरात राहत असल्याने ते एकमेकांच्या परिचित आहेत. दोन दिवसांपूर्वी हुसैनने योगेशच्या मुलीला शिवीगाळ करुन मारहाण केली होती. हा प्रकार मुलीकडून योगेशला समजताच तो प्रचंड संतप्त झाला होता.
शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता हुसैन हा एलआयसी कार्यालयाजवळ होता. यावेळी तिथे योगेश आणि श्रीकांत आले आणि त्यांनी मुलीला मारहाण केल्याचा जाब विचारुन त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. रागाच्या भरात या दोघांनी हुसैनला बेदम मारहाण केली होती. हाताने आणि लाथ्याबुक्यांनी केलेल्या मारहाणीत हुसैन हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे उपचार सुरु असताना हुसैनचा मृत्यू झाला.
हॉस्पिटलमधून ही माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हुसैनचा भाऊ हसन मोहम्मद याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीनंतर घडलेला प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी योगेश आणि समीर धिवर या दोन्ही आरोपीविरुद्ध हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर रविवारी दुपारी त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.