मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 ऑक्टोंबर 2025
वसई, – एमडी ड्रग्जची डिलीव्हरीसाठी आलेल्या एका नायजेरीयन नागरिकाला वसई युनिटच्या अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. कालू बॅसे चुक्वूमेका असे या 45 वर्षीय नायजेरीयन नागरिकाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे 43 लाखांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
नालासोपारा परिसरात काही विदेशी नागरिक एमडी ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती वसई युनिटच्या अॅण्टी नारकोटीक्स सेलला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस निरीक्षक ऋषिकेश पवळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शेलवलकर, पवार, सहाय्यक फौजदार पागदरे, आसिफ मुल्ला, राजू भोईर, उमेश गवई, पोलीस हवालदार संग्राम गायकवाड, अमीत चव्हाण, सुधीर नरळे, सुनिल पागी, पोलीस अंमलदार राज गायकवाड, अजीत मेड, अंगत मुळे, नितीन राठोड यांनी साध्या वेशात पाळत ठेवली होती.
शनिवारी दुपारी पावणेबारा वाजता नालासोपारा येथील मास्टर क्रिकेट क्लब ग्राऊंडच्या समोरील 90 फिट रोड परिसरात एक विदेशी नागरिक आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एमडी ड्रग्ज सापडले. या कारवाईत पोलिसांनी 214 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, एक मोबाईल, एक सिमकार्ड असा 42 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तपासात कालू चुक्वूमेका हा मूळचा नायजेरीयन नागरिक असून सध्या नालासोपारा, प्रगतीनगर परिसरात राहतो. त्याच्याविरुद्ध तुळींज पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांचा तपास नंतर अॅण्टी नारकोटीक्स सेलकडे सोपविण्यात आला. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याला ते ड्रग्ज कोणी दिले, ते ड्रग्ज कोणाला देण्यासाठी आला होता, त्याने यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.