एटीएम मशिनमध्ये पट्टी लावून पैसे काढणार्या टोळीचा पर्दाफाश
उत्तरप्रदेशातील दोन रेकॉर्डवरील आरोपींसह तिघांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – एटीएम मशिनमध्ये पट्टी लावून पैसे काढणार्या उत्तरप्रदेशातील एका टोळीचा मालाड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीशी संबंधित तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यातील दोन आरोपींविरुद्ध उत्तरप्रदेशात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मोहम्मद आरिफ युसूफ खान, अब्दुल हकीक शमशाद खान आणि दानिश अली वासिफ खान अशी या तिघांची नावे असून ते तिघेही उत्तरप्रदेशच्या प्रतापगढचे रहिवाशी आहेत. या टोळीने अशाच प्रकारे अंधेरी, वांद्रे, कांदिली, बोरिवली, चेंबूर आणि मालाड परिसरातील एटीएम सेंटरमधून पैसे काढल्याचे तपासात उघडकीस आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांनी सांगितले. अटकेनंतर तिन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
कलीम अजीम मुल्ला मनिहार हे मालाडच्या लिंक रोड, चिंचोली बंदर परिसरात राहतात. बुधवारी 8 ऑक्टोंबरला ते मालाडच्या स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये आले होते. त्यांनी त्यांचे डेबीट कार्डवरुन पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे डेबीट कार्ड एटीएम मशिनमध्ये अडकले होते. याच दरम्यान तिथे एक तरुण आला आणि त्याने त्यांची मदत करण्याचा बहाणा करुन त्यांचे एटीएम कार्ड काढले. यावेळी त्याने त्यांच्या कार्डचा पासवर्ड पाहिला होता. त्यानंतर त्याने त्यांच्या डेबीट कार्डची चोरी करुन त्यांच्या डेबीट कार्डवरुन एटीएमधून 40 हजार रुपये काढले होते.
पैसे डेबीट झाल्याचा मॅसेज प्राप्त होताच त्यांना फसवणुकीचा हा प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी मालाड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीसह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. एटीएम सेंटरसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर पोलिसांना तिथे एक कार संशयास्पदरीत्या दिसली होती. या कारची माहिती काढताना ती कार चेंबूर येथे गेल्याचे दिसून आले. त्यानंतर कारच्या क्रमांकावरुन पोलिसांनी त्याच्या मालकाचा शोध घेतला. त्याला विश्वासात घेतल्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपींची नावे समजली होती.
त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रमोद बागल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक रायवाडे, पोलीस हवालदार जुवाटकर, गोंजारी, फर्नाडिस, शेरे, वाघ यांनी मोहम्मद आरिफ, अब्दुल हकीक आणि दानिश खान या तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच हा केल्याची कबुली दिली. तपासात ही टोळी एटीएम मशिनमध्ये पट्टी लावून डेबीट कार्ड अडकल्याचे भासवून खातेदारांच्या डेबीट कार्डसह पासवर्ड मिळवून पैशांचा अपहार करत असल्याचे उघडकीस आले. त्यांनी अंधेरी, वांद्रे, कांदिली, बोरिवली, चेंबूर आणि मालाड परिसरातील काही एटीएम सेंटरमधून पैसे काढल्याची कबुली दिली आहे.
तपासात ते तिघेही उत्तरप्रदेशचे रहिवाशी असून सध्या मुंबई शहरात भाड्याच्या रुममध्ये राहत होते. अब्दुल आणि दानिश हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध उत्तरप्रदेशात काही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघडकीस आले. मोहम्मद आरिफ कारचालक, अब्दुल हकीक ट्रकचालक तर दानिश हा मजुरीचे काम करतो. त्यांनी आतापर्यंत कुठल्या एटीएम सेंटरमधून पैसे काढले आहेत, त्याची माहिती काढण्याचे सुरु आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.