अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन मुंबई पोलिसांना आव्हान देणार्या अपहरणकर्त्याला अटक
आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ एप्रिल २०२४
मुंबई, – गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यांत चेंबूर येथून एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी नरेश रामआशिष राय या ३० वर्षांच्या मुख्य आरोपीस बिहार येथून आरसीएफ पोलिसांनी अटक केली. त्याच्या तावडीतून पोलिसांनी पिडीत मुलीची सुटका केली आहे. पिडीत मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर नरेशविरुद्ध अपहरणासह लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे या मुलीचे अपहरण करुन नरेश हा काठमांडू, दिल्ली आणि बिहार येथे अस्तिस्व लपवून राहत होता, त्याने मुंबई पोलिसांना पकडून दाखविण्याचे आव्हान दिले होते. अखेर आठ महिन्यानंतर त्याला पोलिसांनी गजाआड केले.
तक्रारदार चेंबूर येथे राहत असून त्यांची पिडीत ही मुलगी आहे. २० ऑगस्ट २०२३ रोजी ती पाणी भरण्यासाठी नळ चालू करण्यास गेली होती, त्यानंतर ती घरातून निघून गेली होती. ती कुठेच न सापडल्याने तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. तिच्या कुटुंबियांनी नातेवाईकासह तिच्या सर्व मित्र-मैत्रिणींना संपर्क साधला होता, मात्र तिच्याविषयी कोणालाही काहीच माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी आरसीएफ पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरु केला होता. तक्रारदारांचा याच परिसरात जरीचा कारखाना आहे. त्यामुळे पोलिसांनी कारखान्यांतील सर्व कामगाराची चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली होती. या चौकशीदरम्यान या मुलीच्या अपहरणाच्या दिवसांपासून त्यांचा एक कामगार नरेश राय हा कामावर येत नव्हता. त्याचा मोबाईल क्रमांक बंद होता. त्यामुळे नरेशच्या नातेवाईकांची पोलिसांनी चौकशी केली होती, मात्र त्यांच्या चौकशीतून नरेशविषयी काहीच माहिती मिळू शकली नाही.
तपासात नरेशने या मुलीचे अपहरण केल्याचे उघडकीस आले होते. त्याची पोलीस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी गंभीर दखल वरिष्ठ पोलीस निरीक्षक केदारी पवार यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक केदारी पवार यांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे, पोलीस उपनिरीक्षक रमेश खपाले, पोलीस हवालदार अनिल घरत, प्रितम पाटील यांनी नरेशची जास्तीत जास्त माहिती काढण्यास सुरुवात केली होती. यावेळी नरेशने सीमकार्ड आणि दोन मोबाईल बदलले होते. तो दिल्ली आणि नंतर काठमांडू येथे वेगवेगळ्या ठिकाणी स्वतचे वास्तव्य बदलून राहत होता. गेल्या आठ महिन्यांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. यावेळी त्याने त्याच्या एका मित्राला फोन करुन मुंबई पोलिसांना सांग, हिम्मत असेल तर माझ्यासह पिडीत मुलीला शोधून दाखवा. कितीही प्रयत्न करा, आम्ही तुम्हाला सापडणार नाही असे आव्हान केले होते.
नरेशचे आव्हान स्विकारुन पोलीस टिम बिहारला गेली होती. तिथे दोन दिवस पोलिसांनी त्याच्यासाठी पाळत ठेवली होती. यावेळी नरेश हा माधवपुरा सुस्ता परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर आरसीएफ पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने नरेशला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीनंतर या पथकाने बिहारच्या मुजफ्फपूर येथून पिडीत मुलीची सुटका केली. तिथेच नरेश हा पिडीत मुलीसोबत राहत होता. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर गेल्या आठ महिन्यांत अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध अपहरणासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला तेथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला ट्रॉन्झिंट रिमांड दिले होते. ट्रान्झिंट रिमांड मिळाल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. पिडीत मुलीची मेडीकल करण्यात आली असून तिला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले होते.
दुसरीकडे अटकेत असलेल्या नरेशला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलिसांनी अटक केली. पंधरा वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन नरेशने मुंबई पोलिसांनी पकडण्याचे आव्हान दिले, या आव्हानानंतर तब्बल आठ महिने त्याची माहिती काढून अखेर त्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली. नरेशला अटक करणार्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक केदारी पवार यांच्यासह त्यांचे पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे, पोलीस उपनिरीक्षक रमेश खपाले, पोलीस हवालदार अनिल घरत, प्रितम पाटील यांचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.