एमडी ड्रग्जप्रकरणी हवाला व्यावसायिकाला अटक

ड्रग्ज तस्करीचे पैसे मुख्य आरोपीला पुरविल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ एप्रिल २०२४
मुंबई, – कोट्यवधी रुपयांच्या एमडी ड्रग्जप्रकरणी एका हवाला व्यावसायिकाला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. जेसाभाई मोटाभाई माली असे या व्यावसायिकाचे नाव असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अटक झालेला जेसाभाई हा अकरावा आरोपी आहे. या गुन्ह्यांत यापूर्वी एका महिलेसह दहाजणांना पोलिसांनी अटक केली असून ते सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जेसाभाईवर या कटातील मुख्य आरोपी प्रविण ऊर्फ नागेश रामचंद्र शिंदे याला ड्रग्ज तस्करीचे पैसे हवालमार्गे पुरविल्याचा आरोप आहे.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत एमडी ड्रग्ज तस्करी करणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला होता. याच गुन्ह्यांत एका महिलेसह दहाजणांना पोलिसांनी मुंबईसह गुजरात आणि सांगली येथून पोलिसांनी अटक केली होती. त्यात परवीनबानो गुलाम शेख, साजिद मोहम्मद आसिफ शेख ऊर्फ डेबस, इजाजअली इमदादअली अन्सारी, आदित्य इम्तियाज बोहरा, प्रविण ऊर्फ नागेश रामचंद्र शिंदे, वासुदेव लक्ष्मण जाधव, प्रसाद बाळासो मोहिते, विकास महादेव मलमे, अविनाश महादेव माळी आणि लक्ष्मण बाळू शिंदे यांचा समावेश होता. या टोळीचा प्रमुख प्रविण शिंदे असून त्याने सहा महिन्यूर्वी सांगली येथील महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमडी बनविण्याचा एक कारखाना सुरु केला होता. या कारखान्यांची माहिती प्राप्त होताच गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी तिथे कारवाई करुन कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. या कारवाईत पोलिसांनी आतापर्यंत २५२ कोटी २८ लाख रुपयांचे १२६ किलो १४१ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, १५ लाख ८८ हजार रुपयांची कॅश, दिड लाखाचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि दहा लाख रुपयांची एक स्कोडा कार असा २५२ कोटी ५५ लाख ३८ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त होता. या गुन्ह्यांत नंतर भिवंडी येथून पोलिसांनी मुख्य आरोपीच्या मित्राच्या घरातून ३ कोटी ४६ लाख ६८ हजार २०० रुपयांची कॅश जप्त केली होती.

आरोपींच्या चौकशीदरम्यान जेसाभाई माली या हवाला व्यावसायिवकाचे नाव समोर आले होते. तो ड्रग्ज विक्रेत्याकडून आलेली कॅश या कटातील मुख्य आरोपी प्रविण शिंदे याला देत होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने प्रविण पाटीलला हवालामार्फत पैसे दिल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या गुन्ह्यांत त्याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page