मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – मारामारीसह दुखापतीच्या गुन्ह्यांत गेल्या बारा वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या दोन आरोपींना साकिनाका पोलिसांच्या एका विशेष पथकाने ठाण्यातील कासारवडवली परिसरातून अटक केली. दयाशंकर अदालत त्रिपाठी आणि महेंद्र बेकारु चौधरी अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही कोर्टात हजर करण्यात आले होते. गुन्ह्यांत जामिन मिळताच ते दोघेही मुंबईतून पळून गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
2012 रोजी साकिनाका परिसरात झालेल्या एका मारामारीसह दुखापतप्रकरणी दयाशंकर आणि महेंद्र यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर काही दिवसांनी त्यांना जामिन मंजूर झाला होता. मात्र जामिनावर बाहेर येताच ते दोघेही पळून गेले होते. ते दोघेही खटल्यासाठी नियमित गैरहजर राहत होते. त्यामुळे त्यांना पोलिसांनी फरारी आरोपी घोषित केले होते. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध कोर्टाने जाहीरनामा वॉरंट जारी केले होते. तसेच त्यांच्या अटकेसाठी विशेष प्रयत्न करण्याची सूचना साकिनाका पोलिसांना दिली होती.
या घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी गंभीर दखल घेत साकिनाका पोलिसांना दोन्ही आरोपींच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप मैराळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल यादव यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नेत्रा मुळे, पोलीस हवालदार सांडव, होळकर यांनी दोन्ही आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना दयाशंकर आणि महेंद्र हे दोघेही ठाण्यातील कासारवडवली परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून त्यांच्याविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नात असताना दयाशंकर त्रिपाठी आणि महेंद्र चौधरी या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कोर्टाने जाहिरनामा वॉरंट जारी केलेले ते दोघेही तेच आरोपी असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या दोघांनाही अटक करुन कोर्टात हजर करण्यात आले होते.