जॉय राईडसाठी बाईक चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

तेरा व सोळा वर्षांच्या दोन मुलांकडून आठ बाईक जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ एप्रिल २०२४
मुंबई, – जॉय राईडसाठी बाईक चोरी करणार्‍या एका अल्पवयीन मुलांच्या टोळीचा मुलुंड पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी तेरा आणि सोळा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या आठ बाईक हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर या दोन्ही मुलांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांत मुलुंड आणि भांडुप परिसरातून बाईक चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. या बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी मुलुंड पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजमध्ये पोलिसांना दोन अल्पवयीन मुले बाईक चोरी करताना दिसून आले होते. त्यामुळे या मुलांची पोलिसांनी माहिती काढण्यास सुरुवात केली होती. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलीस निरीक्षक आदिनाथ गावडे व त्यांच्या पथकाने तेरा आणि सोळा वयोगटातील दोन अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच मुुलुंड आणि भांडुप परिसरातून आठहून अधिक बाईक चोरी केल्याची कबुली दिली होती. २२ मार्चला या दोघांनी मुलुंड येथील स्वप्ननगरी, स्वप्न महल इमारतीच्या गेटजवळ पार्क केलेली टीव्हीएस ज्युपिटर कंपनीची एक स्कूटी चोरी केली होती. यावेळी तिथे असलेल्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये ते दोघेही कैद झाले होते. हाच धागा पकडून नंतर या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या दोघांकडून पोलिसांनी चार लाख पंधरा हजार रुपयांचे चोरीच्या आठ बाईक हस्तगत केल्या आहेत. यातील पाच बाईक त्यांनी मुलुंड तर एक बाईक भांडुप येथून त्यांनी चोरी केली होती. दोन बाईक मालकांचा शोध सुरु आहे. दोन्ही आरोपी सराईत बाईक चोर असून जॉय राईडसाठी ते बाईक चोरी करत होते. ते दोघेही रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडायचे. रस्त्यावर पार्क केलेल्या बाईक पायाने लॉक तोडून ती घेऊन पळून जात असल्याचे उघडकीस आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र दळवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आदिनाथ गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते, पोलीस हवालदार देवेंद्र कातकर, संदीप वाळे, पोलीस शिपाई विष्णू राठोड, सुनिल विंचू, अनिल पारधी, मोहन निकम यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page