महानगरपालिकेचे कंत्राटाच्या बहाण्याने व्यावसायिकाची फसवणुक
पाच कोटीच्या फसवणुकीप्रकरणी व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – महानगरपालिकेचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट मिळाल्याचा दावा करुन डिपॉझिटसाठी पाच कोटीची मागणी करुन एका व्यावसायिकाची त्याच्याच परिचित व्यावसायिकाने फसवणुक केल्याचा प्रकार भेंडीबाजार परिसरात उघडकीस आला आहे. पाच कोटीच्या फसवणुकीप्रकरणी मोहम्मद गुलाम रोशन या व्यावसायिकाविरुद्ध जे. जे मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पाच कोटीच्या डिपॉझिटची रक्कम दिल्यास दरमाह अठरा लाखांचे व्याजाचे गाजर दाखवून मोहम्मद गुलामने ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
ही घटना डिसेंबर 2022 ते ऑक्टोंबर 2025 या कालावधीत भेंडीबाजार येथील निजाम स्ट्रिट, प्लॉट क्रमांक 53/55, इब्राहिम मेंशनमध्ये घडली. याच मेंशनच्या सातव्या मजल्यावरील रुम क्रमांक 34 मध्ये अनिस निजाम खान हे व्यावसायिक त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा स्वतचा व्यवसाय आहे. त्यांचा मोहम्मद गुलाम हा परिचित आहेत. तीन वर्षांपूर्वी त्याने त्यांना त्याला महानगरपालिकेचे एक मोठे कंत्राट मिळाल्याचा बहाणा केला होता. या कंत्राटासाठी आधी पाच कोटीची डिपॉझिटची रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम भरल्यांनतर त्यांना संबंधित कंत्राट मिळेल. या कंत्राटामुळे त्यांना प्रचंड फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांनी पाच कोटीची डिपॉझिटची रक्कम भरण्यास त्याला मदत करावी. या मोबदल्यात त्याने अनिस खान यांना दरमाह अठरा लाख रुपयांचे व्याज देण्याचे आमिष दाखविले होते.
मोहम्मद गुलाम हा त्याचा परिचित व्यावसायिक होता. त्यामुळे त्याच्या या आमिषाला बळी पडून त्यांनी त्याला कंत्राटाच्या डिपॉझिटसाठी टप्याटप्याने पाच कोटी रुपये दिले होते. मात्र ही रक्कम दिल्यानंतर त्याने त्यांना व्याजाचे अठरा लाख रुपये दिले नाही. विचारणा करुनही तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे त्यांच्या पाच कोटीची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्यांना पैसे परत न करता त्यांच्या पाच कोटीच्या अपहार करुन फसवणुक केली होती.
या घटनेनंतर त्यांनी घडलेला प्रकार जे. जे मार्ग पोलिसांना सांगून आरोपी व्यावसायिक मोहम्मद गुलाम रोशन याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. मोहम्मद गुलामने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.