मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ एप्रिल २०२४
मुंबई, – कथित खिचडी घोटाळाप्रकरणी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार अमोल गजानन किर्तीकर यांची सोमवारी दुपारी ईडीकडून तब्बल आठ तास कसून चौकशी करण्यात आली. साडेअकरा वाजता ईडी कार्यालयात गेलेले अमोल किर्तीकर हे सायंकाळी साडेसात वाजता बाहेर आले. या चौकशीचा तपशील समजू शकला नाही. अमोल किर्तीकर ठाकरे गटाचे वायव्य मुंबईतील उमेदवार असून त्यांना उमेदवारी जाहीर होताच ईडीने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते, मात्र त्यांनी ईडी अधिकार्याकडे चौकशीसाठी वेळ मागून घेतली होती. त्यानंतर त्यांची सोमवारी सुमारे आठ तास ईडी अधिकार्यांनी चौकशी केली.
कोरोना काळात महानगरपालिकेने स्थालांरीत परप्रांतियांसाठी खिचडीचे वाटप केले होते. या खिचडी वाटपात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाल्याचा आरोप झाला होता. या भष्ट्राचाराची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली होती. त्यात अमोल किर्तीकर यांच्यासह इतर काही राजकीय नेत्यासह महानगपालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्यांचे नावे समोर आली होती. त्यामुळे या सर्वांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. त्यात अमोल किर्तीकर यांचीही पोलिसांनी चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली होती. या घोटाळ्यात मनी लॉड्रिंग झाल्याचे उघडकीस येताच संबंधित आरोपीविरुद्ध ईडीने गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. अमोल किर्तीकर यांना घोटाळ्यातील काही रक्कम मिळाली होती. त्यामुळे त्यांना २७ मार्चला चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले होते. मात्र अमोल किर्तीकर यांनी चौकशीला हजर न राहता त्यांच्या वकिलांच्या मदतीने ईडी अधिकार्यांकडे वेळ मागून घेतला होता. त्यानंतर त्यांना ईडीने दुसरे समन्स बजाविले होते. त्यात त्यांना सोमवारी ८ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. ठरल्या्रपमाणे सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता ते ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांची ईडी अधिकार्याकडून कसून चौकशी करण्यात आली होती. यावेळी त्यांची जबानी नोंदवून सायंकाळी साडेसात वाजता सोडून देण्यात आले. चौकशीनंतर अमोल किर्तीकर यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले. २८ मार्चला उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यात अमोल किर्तीकर यांना वायव्य मुंबईतून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे त्याच दिवशी त्यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजाविले होते. या समन्सनंतर गैरहजर राहिल्यानंतर अमोल किर्तीकर हे सोमवारी चौकशीसाठी हजर राहिले होते.