बेकायदेशीर राहणार्‍या सहा अफगाणी नागरिकांना अटक

बोगस कागदपत्रांच्या मदतीने अनधिकृतपणे वास्तव्यास होते

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – मुंबई शहरात बेकायदेशीर राहणार्‍या सहा अफगाणी नागरिकांना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी एका विशेष मोहीमेतर्गत अटक केली. वैद्यकीय व्हिसा घेऊन भारतात आल्यानंतर या सहाजणांनी बोगस नावासह कागदपत्रांच्या आधारे ते भारतीय नागरिक असल्याचे पुरावे गोळा केले होते, मात्र चौकशीत ते सर्वजण अफगाणी नागरिक असल्याचे उघडकीस आले. मोहम्मद जाफर नबीउल्लाह खान, असद समसुद्दीन खान, मोहम्मद रसुल नसोजय खान, अख्तर मोहम्मद जमालउद्दीन, झिआउल हक मोहम्मद गौसिया खान आणि अब्दुल मन्नन वाहिद खान अशी या सहाजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

गेल्या काही वर्षांत मुंबईसह आसपासच्या शहरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्यास असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी अशा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यात अनेक बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. या कारवाईदरम्यान मुंबईतील कुलाबा आणि धारावी परिसरात काही अफगाणी नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने या अफगाणी नागरिकाविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती.

ही शोधमोहीम सुरु असताना कुलाबा, फोर्ट आणि धारावी येथून सहा संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान ते सर्वजण अफगाणी नागरिक असलचे उघडकीस आले. ते सर्वजण काबुल, अंधारचे रहिवाशी होते. गेल्या दहा वर्षांत ते सर्वजण टप्याटप्याने वैद्यकीय व्हिसा घेऊन भारतात आले होते. काही वर्ष दिल्लीत वास्तव्य केल्यानंतर त्यांची व्हिसाची मुदत संपली होती. याच दरम्यान ते सर्वजण मुंबईत आले होते.

कारवाईच्या भीतीने त्यांनी बोगस नावासह कागदपत्रांच्या आधारे त्यांनी भारतीय नागरिक असल्याचे पुरावे जमा केले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी संबंधित सहाही नागरिकांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन या सर्वांना त्यांच्या मूळ देशात अफगाणिस्तानात पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page